मरणकाळी परमात्म्याचे स्मरण हे मुख्यत: अग्नी व उष्णता यांमुळे हाेते.या अग्नीमुळेच सर्व शरीराला व बुद्धीला सामर्थ्य मिळते. हा विचार समजावून सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात की, लाकडे अग्नीत घातली की अग्निरूप हाेऊन जातात. पुन्हा त्यांचे लाकूड दिसत नाही. उसाची साखर झाल्यावर पुन्हा साखरेचा ऊस हाेत नाही.परिसाच्या स्पर्शाने लाेखंडाचे साेने झाले की पुन्हा साेन्याचे लाेखंड हाेत नाही. दुधाचे तूप झाले की पुन्हा त्या तुपापासून दूध मिळत नाही. त्याप्रमाणे मरणसमयी अक्षरपुरुषाची प्राप्ती झाली की पुन्हा जन्ममरणरूपी ेरा प्राप्त हाेत नाही. या अक्षरपुरुषाचे परमधाम काेणते? या प्रश्नाचे उत्तर देताना ज्ञानेश्वर म्हणतात की, मरणसमयी देह साेडल्यानंतर ज्या ठिकाणी याेगी जाऊन मिळताे ते माझेपरमधाम हाेय. पण कधी अकालीच देह साेडला तर त्याला पुनर्जन्म घ्यावा लागताे.
म्हणून शास्त्राने सांगितलेल्या काळानुसार देहाचा त्याग याेगीलाेक करतात आणि ब्रह्मरूप हाेऊन जातात. अकाली देह साेडला तर पुन्हा संसारात यावे लागते. याप्रमाणे ब्रह्मरूप हाेणे वा संसारात येणे या दाेनही गती कालाच्या स्वाधीन आहेत. मरणकाली बुद्धीला भ्रम झाला नाही. स्मरणशक्ती आंधळी झाली नाही, म्हणजे मन सावध राहते. अंत:करणास ब्रह्मभावाचा अनुभव येताे.मरणकालापर्यंत ही सावधानता अग्नीच्या सहाय्यामुळे शक्य हाेते. अग्नीच्या बळावाचून देहामध्ये चैतन्यशक्ती राहू शकत नाही. अग्नी वा उष्णता नाहीशी झाल्यावर देह रहात नाही. ठेवलेली वस्तू दिव्याने शाेधण्यापूर्वी दिवाच विझावा, त्याप्रमाणे अनुसंधान विसरले तर काही उपयाेग नाही.मरतेवेळी ब्रह्मभाव स्थिर रहावा म्हणून अग्नीची मदत घेणे अगत्याचे आहे.