प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी ।।

    19-Jul-2023
Total Views |
 
 
 

Gondavlekar 
सर्वांचें राखावें समाधान । पण रामाकडे लावावें मन ।। रामाला स्मरून वागावें जगांत आपण । तेथें पश्चात्तापाला नाहीं कारण ।। म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत । हा जाणावा खरा परमार्थ ।। व्यवहार करावा व्यवहारज्ञानानें । परमार्थ करावा गुरुआज्ञेनें ।। कली अत्यंत माजला । गलबला चाेहाेंकडून जरी झाला । चित्त ठेवावें रामावर स्थिर । कार्य घडतें बराेबर ।। स्वस्थ बसावें एके ठिकाणीं । राम आणत जावा मनीं ।। प्रयत्नांतीं परमात्मा । ही खूण घालावी चित्ता । व्यवहारीं ठेवावी दक्षता ।। मागील झालें तें हाेऊन गेलें । पुढील हाेणार तें हाेऊं द्यावें भलेें । त्याचा न करावा विचार । आज चित्तीं स्मरावा रघुवीर ।। आंतबट्ट्याचा नाहीं व्यापार । ज्यानें घरीं आणला रघुवीर ।। नुसत्या प्रयत्नानें जग सुखी हाेतें । तर दु:खाचें वारें न भरतें ।। म्हणून परमात्मा आणि प्रयत्न । यांची घालावी सांगड । म्हणजे मनीं न वाटे अवघड ।। जेथें वाटतें हित । तेथें गुंतत असतें चित्त । चित्त गुंतवावें भगवंतापाशीं । देह ठेवावा व्यवहाराशीं ।। चित्तीं ठेवावी एक मात । कधीं न सुटावा भगवंत ।। राम माझा धनी । ताेच माझा रक्षिता जनीं । हें आणून चित्तीं । विषयाची याेग्यतेनें करावी संगती ।। देह करावा रामार्पण। मुखीं घ्यावे नामस्मरण ।।
 
संताची संगति । रामावर प्रीति । ताेच हाेईल धन्य जगतीं ।। व्यवहार सांभाळून । करावा परमार्थ जतन ।। राम ठेवावा हृदयांत । जपून असावें व्यवहारांत ।। रामाचें चिंतन, नामाचें अनुसंधान, । वृत्ति भगवत्परायण, साधुसंतास मान, । आल्या अतिथा अन्नदान, । भगवंताला भिऊन वागणें जाण, । याविण परमार्थ नाहीं आन । प्रपंचांत असावी खबरदारी । मन लावावे रामावरी । त्याचा राम हाेईल दाता । न करावी कशाचीहि चिंता ।। करवंटीचें कारण । खाेबरें राहावें सुखरूप जाण । तैसे आपले देहाचे संबंध ठेवून । चित्तीं असावा रघुनंदन ।। परमार्थ करावा जतन । मन करून रामाला अर्पण ।। प्रपंचीं असावें सावध । कर्तव्यीं असावें दक्ष । तरी न साेडावा रामाचा पक्ष ।। प्रयत्नांतीं परमेश्वर हे सज्जनांचे बाेल । मनीं ठसवावें खाेल ।। पण आरंभीं स्मरला राम । त्यालाच प्रयत्नांतीं राम । हा ठेवावा विश्वास । सुखें साधावे संसारास ।। कर्तव्यांत भगवंताचें स्मरण । हेेंच समाधान मिळण्याचें साधन ।। प्रयत्न करावा मनापासून । फळाची अपेक्षा न ठवून ।। कर्तव्यांत असावें तत्पर । नि:स्वार्थबुद्धी त्याचे बराेबर ।। जाेंवर देहाची आठवण । ताेंवर व्यवहार करणें जतन । म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून । यश देणें न देणें भगवंताचे अधीन ।। दाता राम हें आणून चित्तीं । आपण वर्तावें जगतीं ।।