इंद्रियांच्या विषयांत गुंतल्यामुळे आपण कसे भ्रांत हाेताे याचे विवेचन ज्ञानेश्वरमहाराज गीतेच्या आधाराने दर्शवीत आहेत.विषयांसारखे सुख नाही असे भासवणे हा इंद्रियांचा धर्मच आहे.पण वास्तविक पाहता या विषयांना मृगजळापेक्षा अधिक सत्यता नाही. म्हणून भगवान सांगतात की, अर्जुना, क्षणभर टिकणारे हे विषय तू साेडून दे. त्यांचा संग धरू नकाेस. खरे पाहता विषय सुखांत ज्यांना गाेडी वाटत नाही त्यांना सुखदु:खही हाेत नाही. ते नित्य अविनाशी स्वरूपाच्या म्हणजे ब्रह्मरूपाच्या पदाला पाेहाेचतात. गीतेच्या या अध्यायातील साेळाव्या श्लाेकात ‘नासताे विद्यते भावाे ना भावे विद्यते सत:।’ असा संदर्भ आहे. याचा अर्थ असा की, असत् म्हणजे खाेट्या वस्तूचे मुळी अस्तित्वच नसते. म्हणजेच त्याचे अस्तित्व नाहीसे हाेत नाही. या श्लाेकाचा भावार्थ सांगताना ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात की, ‘आतां अर्जुना काहीं एक।
सांगेन मी आइक। जें विचारपर लाेक वाेळखती।।’ 125 अर्जुना, आता आणखी एक महत्त्वाची गाेष्ट तुला सांगताे ती नीट ध्यानात ठेव. फक्त विचारी लाेकांनाच ती नीट समजते. ही बाब अशी की, या नामरूपात्मक जगामध्ये एक चैतन्यतत्त्वच व्यापून आहे. पण ते गुप्त रितीने आहे.नामरूपाने ते झाकलेले असल्याकारणाने आपणास दिसत नाही. पण तत्त्वज्ञ जे आहेत त्यांची अखंड दृष्टी त्याच्याकडेच असते. हा तत्त्वविचार समजावून सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांनी समर्पक दृष्टांत दिले आहेत.पाण्यांत दूध मिसळलेले की ते पाण्याशी मिसळून जाते.पण हंस मात्र ते वेगळे करून दाखविताे. साेने तापवून त्यातील हीन काढून शुद्ध साेने वेगळे करता येते. दह्याचे घुसळण केले की लाेणी बाहेर पडते. त्याप्रमाणे विचार केला असता केवळ एक चैतन्यवस्तूच शिल्लक राहते.