अर्जुनावर भगवंतांचे अतिशय प्रेम हाेते. ताे आपणांस ज्ञानी समजून भगवंतांना कितीही तत्त्वज्ञान सांगत असला, युद्धापासून निवृत्तहाेण्याच्या विचारात असला तरी भगवंतांचे माहात्म्य त्याने जाणले हाेते. श्रीहरी आपले पिता आहेत, सद्गुरू आहेत, असे म्हटल्याबराेबर अर्जुनाचेच मन विचलित झाले. ताे म्हणाला, देवा, आई जर आपल्या बाळाची उपेक्षा करील तर ते बाळ जिवंत कसे राहील? ‘तैसा सर्वांपरि आम्हासी। देवा तूंचि एक आहासी। आणि बाेलिलें जरी न मनिसी। मागील माझें।’(62).देवा, त्याप्रमाणे सर्वताेपरी तूच एक आम्हांस आहेस.माझ्या मागील बाेलण्याकडे तू लक्ष देऊ नकाेस, हित काय, अहित काय हे तूंच मला सांग. ‘देवा, हे आप्तजन पाहून माझ्या मनास शाेक झाला ताे तुझ्या उपदेशावाचून दूरहाेणार नाही. सर्व पृथ्वीचे राज्य मिळाले तरी माझे समाधान हाेणार नाही. केवळ तू उपदेश करशील तरच माझे मन शांत हाेईल.’असे अर्जुन म्हणाला ताेच त्याला, शाेकाची पुन्हा ऊर्मी आली.
अर्जुनाला माेहरूपी सर्पाने दंश केला. या विषबाधेचे वेग थांबत नव्हते. ही बाधा दूर करणारा मांत्रिक केवळ श्रीकृष्णच हाेते. हे अर्जुनाला माहीत असल्यामुळेच निर्णय घेण्याचे कार्य त्याने श्रीकृष्णांकडे साेपविले. अर्जुन माेहाने व्याकुळ झाला असता श्रीकृष्ण जवळच उभे हाेते.आपल्या कृपाकटाक्षाने ते त्याचा माेह दूर करतील असे वाटू लागते. अर्जुन मात्र यावेळेला भ्रांतीने पछाडलेला हाेता. मेघांनी व्यापलेल्या सूर्यासारखा म्लान दिसत हाेता.हा अर्जुन उन्हाळ्यात पेटलेल्या पर्वताप्रमाणे दिसत हाेता.अशा वेळी त्याला शांत करण्यासाठी स्वाभाविकच सुंदर, करुणाघन व नीलवर्ण असलेला श्रीकृष्णरूपी अमृतमेघ अर्जुनावर वळला. या वेळी भगवंताचे दात हिऱ्याप्रमाणे चमकत हाेते.