वेदु संपन्नु हाेय ठाईं। परि कृपणु ऐसा आनु नाहीं। जे कानीं लागला तिहीं। वर्णांचांचि।। (18.1457)

    09-Jun-2023
Total Views |
 
 

Dyaneshwari 
 
ज्ञानेश्वरीतील ही एक ओवी मार्मिक असली तरी थाेडी वादग्रस्त आहे. वेद हे श्रेष्ठ खरे. ‘नाहीं श्रुतीपराैति। माऊली जगा।’ असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. म्हणजे त्यांच्या मते वेद हेच सर्व जगाला माऊलीप्रमाणे आहेत. पण माउली असली तरी तिच्या प्रेमात आपल्या अपत्यांबद्दल थाेडा फरक पडताे. हे ध्यानात घेऊन ज्ञानेश्वरांनी वेदांच्या कमतरतेवर नेमके बाेट ठेवले आहे. सर्व संसार सुखाचा करीन ही ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा आहे. ज्ञानेश्वरीचे निरूपण आर्तांचे, पीडितांचे दु:ख दूर व्हावे म्हणून झाले आहे.ज्ञानेश्वरांच्या भक्तिपंथात जातिभेदास स्थान नाही. सर्व जग एकाच बीजापासून निर्माण झाले आहे.एक लहान, एक माेठा असे कसे हाेईल? पुढे कबीरांनी प्रश्न विचारला आहे की, ‘एक बम्म से विश्व रचा है। काे बम्मन काे शूदा?’
 
एकाच ब्रम्हापासून जर हे विश्व निर्माण झाले आहे तर एक थाेर व दुसरा लहान हा भेद आला काेठून? एकाच सुवर्णाच्या धाग्यात साेन्याचे मणी ओवलेले आहेत.या मण्यात लहान माेठा असा भेद नाही. ज्ञानेश्वरांच्या काळात पंढरीचा देव लेकुरवाळा झाला हाेता अशी जनाबाईंची साक्ष आहे.विठ्ठलाच्या या लेकरांत साेनार हाेता, कुंभार हाेता, न्हावी हाेता, माळी हाेता, महारही हाेता. समाजाचे हे दृश्य ज्ञानेश्वरांच्या या पंथामध्ये आजही दिसते. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांनी वेदांच्या त्रुटीवर साैम्य आक्षेप घातला आहे. वेद संपन्न हे खरे, पण ते कृपण आहेत.कारण ते तीन वर्णांच्याच कानी लागले. ार माेठा समाज चाैथ्या वर्णात हाेता. त्यांनी काय करावयाचे? या प्रश्नाचे उत्तर ज्ञानेश्वर देतात, हा वेदांचा कमीपणा दूर करण्यासाठी वेदच गीतारूपाने प्रकट झाला.