मग सांवळा सकंकणु। बाहु पसराेनि दक्षिणु। आलिंगिला स्वशरणु। भक्तराजु ताे।। (18.1418)

    08-Jun-2023
Total Views |
 
 

Dyaneshwari 
 
‘एकतरी ओवी अनुभवाची’ अशा जातीची वरील ओवी आहे.या अध्यायात अर्जुन व श्रीकृष्ण एकरूप झालेले दिसतात. देव अर्जुनाला सांगतात की, सर्व धर्मांचा त्याग करून तू मला एकट्यालाच शरण ये. मी तुला सर्व दाेषांतून मुक्त करीन. तू शाेक बिलकूल करू नकाेस. अरे अर्जुना, दिवस मावळल्यावर मृगजळ नाहीसे हाेते, त्याप्रमाणे व्यर्थ धर्माधर्मांचे अज्ञान नाहीसे करून तू मला येऊन प्राप्त हाे. अज्ञान नाहीसे झाल्यावर आपाेआपच आपण एकटे राहताे. माझ्याहून भिन्न न राहता तू मलाच येऊन मिळताेस.
 
साेन्याचा मणी ज्याप्रमाणे साेनेच असताे, लाट जशी पाणीच असते, त्याप्रमाणे एकत्वाच्या भावनेने मला तू शरण ये. अरे अर्जुना, एखाद्या सामान्य राजानेही जिचा स्वीकार केलेला असताे अशी दासीदेखील राजाच्या समान हाेते. मग तू तर माझी सहजभक्ती केली आहेस आणि अद्वैतभावाने तू मला शरण आला आहेस.सूर्याला अंधार कधी दिसताे का? त्याप्रणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर तुला दुसरे काही दिसणार नाही. तुझे पुण्य व पाप मीच हाेईल. मीठ पाण्यात पडल्यावर पाणीच हाेते.
 
म्हणून तू काेणतीही चिंता करू नकाेस. फक्त मला शरण ये. हे सर्व श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आणि नकळत त्यांनी आपला कंकणयुक्त उजवा हात पसरून अर्जुनाला आलिंगन दिले. आलिंगन उजव्या हातानेच का? कारण डाव्या हातात श्रीकृष्णांनी घाेड्यांचे लगाम हाती धरले हाेते.हा अर्जुन सर्व भक्तांचा राजा हाेता. त्याला सर्वस्व अर्पण करण्यासाठी देवाचे हे आलिंगन हाेते. या आलिंगनामुळे ‘हृदया हृदय एक जालें। ये हृदयींचे ते हृदयीं घातले। द्वैत न माेडितां केलें। आपणाऐसें अर्जुना।।’ (18.1421) याप्रमाणे देवाच्या हृदयातील बाेध अर्जुनाच्या हृदयात प्रकट झाला. देव व भक्त हे द्वैत न माेडता देवांनी अर्जुनाला आपलेसे केले. एका दिव्याने जसा दुसरा दिवा लावावा त्याप्रमाणे हे झाले.