ज्ञानेश्वरमहाराज प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी नमन अथवा मंगलाचरण करतात. देव, देवता, ग्रंथ, सद्गुरु, श्राेते इत्यादींना उद्देशून ज्ञानेश्वरमहाराजांचे हे नमन असते.वस्तुनिर्देशरूप, नमस्काररूप आणि आशीर्वादरूप असे नमनाचे तीन प्रकार आहेत आणि हे तीनही ज्ञानेश्वरीत आढळतात. ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी ॐकाररूप परब्रह्माचे व वाययरूप गणपतीचे नमन केल्यानंतर ज्ञानेश्वरमहाराज वाग्देवता श्रीशारदा अथवा सरस्वती हिला वंदन करीत आहेत. ही शारदा अभिनव आहे. अभिनव म्हणजे नित्यनूतन दिसणारी. नित्यनूतन कशी? तर ज्ञानेश्वरांनीच म्हटल्याप्रमाणे भवानी पार्वती श्रीशंकरांना जशी नित्यनूतन वाटते तशी. ज्ञानेश्वरमहाराजांची प्रतिभा अत्यंत श्रेष्ठ दर्जाची असल्यामुळेत्यांच्या या शारदास्तवनाच्या ओवीला विशेष महत्त्व आले आहे.
प्रतिभा म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर देताना काव्यशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, ‘नवनवाेन्मेषशालिनी प्रज्ञा इति प्रतिभा.’ याचा अर्थ असा की, सृष्टीमधील निगूढ अशी साैंदर्यरहस्ये शाेधून काढण्याचे सामर्थ्य ज्या शक्तीला असते तिला प्रतिभा म्हणतात.हे साैंदर्य अनेकदा नित्यपरिचयामुळे दुर्लक्षित झालेले असते. परंतु प्रतिभावान कवीस या साैंदर्याचा साक्षात्कार नित्य हाेत असताे.म्हणूनच एका अर्वाचीन कवीने म्हटले आहे की, ‘कांचेतूनीही दिसते जनाला। धाेंड्यातूनीही दिसते कवीला।’ या उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांना साैंदर्याचा म्हणजे प्रतिभेचा साक्षात्कार झाला त्याच्या खुणा ज्ञानेश्वरीत जागाेजागी आढळतात. या प्रतिभेची देवी शारदा अथवा सरस्वती हिला ज्ञानेश्वरांनी मनाेभावे प्रारंभीच वंदन केले आहे. शिवाय ही शारदा नानाविधकलांची स्वाभिमानी आहे. ही आपल्या विभ्रमांनी साऱ्या विश्वास माेहिनी घालते.