आपण पाहताे ना, की लहानापासून माेठ्यापर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत, मनुष्याची सारखी धडपड चालू असते; आणि ती म्हणजे समाधानासाठी लहानाचे माेठे झालाे, विद्या झाली, नाेकरी मिळाली, पैसा अडका मिळताे आहे, बायकाे केली, मुलेबाळे झाली, ज्या ज्या गाेष्टीत समाधान मिळेल असे वाटले त्या त्या करिता प्रयत्न केला, परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का? काेणतेही कर्म आपण करताे त्याचा माेबदला आपल्याला पाहिजे असताे.आपण नाेकरी करताे, पण महिनाअखेर पगार मिळाला नाही तर त्या नाेकरीचा काय उपयाेग? तसे, काेणतेही कर्म आपण त्या कर्मासाठी करीत नसून, त्याच्यापासून आपल्याला माेबदला पाहिजे असताे.
जगात अनेक शाेध लागत आहेत, त्यात शरीरसुखभाेगाच्या साधनांचेच शाेध जास्त आहेत. परंतु खऱ्या सुखाचा शाेध, शाश्वत समाधानाचा शाेध, एक साधुसंतच करू शकतात. त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधने सांगितली आहेत त्यांचा अवलंब केला तर आपल्यालाही खात्रीने समाधान मिळेल. आज आपल्याला समाधान का मिळत नाही? तर आपला अभिमान त्याच्या आड येताे. कर्म करीत असताना, किंवा केल्यावर, जर त्याबद्दल अभिमान झाला नाही, तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती हाेईल यात शंका नाही. किती साध्या गाेष्टीत आपला अभिमान डाेके वर काढीत असताे पाहा! एक गृहस्थ हाेते,त्यांना एक मुलगी हाेती. ती वयांत आली. दिसायला ती साधारण बरी हाेती, जवळ पैसाही हाेता; परंतु त्या मुलीचे लग्न पांचसहा वर्षे कुठेही जमू शकले नाही. पुढे तिचे लग्न झाल्यावर ताे म्हणाला, ‘माझ्या मुलीचे लग्न मी थाटांत करून टाकले.’ त्यावर त्याला कुणी विचारले, ‘मग दाेनचार वर्षे आधीच का नाहीं केलेत?
’ तेव्हा ताे म्हणाला,‘त्यावेळी जमले नाही.’ मग लेका, आता ‘जमले’ म्हण की, ‘मी केले’ असे कशाला म्हणताेस? असाे. अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणे हा उपाय साधुसंतांनी स्वत: अनुभवून सांगितला आहे. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला, की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन: दत्तक जावे लागत नाही. तसेच, एकदा रामाच्या पायावर डाेके ठेवून, ‘रामा, मी तुझा झालाे आणि तू माझा झालास,’ असे अनन्यतेने म्हटल्यावर, त्यापुढे हाेणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच हाेईल. ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही. म्हणून, हाेईल ते कर्म त्याचेच मानावे. काेणतेही कर्म अर्पण केले असताना ‘अर्पण करणारा’ उरताेच; तर तसे न व्हावे. भगवंताजवळ असे काही मागा की पुन: दुसरे काही हवेसेच वाटणार नाही.भगवंताच्या नामाची एकदा गाेडी लागली ना, की सर्व काही साधते. नाम अभिमानाचा नाश करते. नामाने हवे-नकाेपणाची बुद्धी हाेत नाही. हेच साधुसंतांनी आवर्जून सांगितलेले नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा, हाच माझा आशीर्वाद.