मागच्या ओवीत वर्णन केलेल्या परब्रह्माचे स्वरूप ज्ञानेश्वरांनी श्रीगणेशामध्ये पाहिले. त्यांचा हा गणेश ॐकाररूप आहे. ते म्हणतात, देवा, तूच प्रत्यक्ष गणेशरूप आहेस. सर्व विद्यांचा तू अधिपती असल्याकारणाने त्यांतील विविध अर्थांचा प्रकाश तुझ्यामुळेच पडला आहे. यानंतर पुढे पंधरा वीस ओव्यांपर्यंत ज्ञानेश्वरांनी या ॐकाररूप गणेशाचेच वर्णन केले आहे. ही शब्दब्रह्माची वाययीन मूर्ती आहे.या गणपतीस सहा हात असून त्यांत सहा दर्शने आहेत. शब्दब्रह्म वेद हेच या गणपतीचे रेखीव शरीर आहे. नाना प्रकारच्या स्मृती म्हणजे त्याचे अवयव आहेत. अठरा महापुराणे म्हणजे त्याच्या अंगावरील जडावाची विविध लेणी आहेत. या अलंकारांतील रत्ने म्हणजे प्रमेये आहेत. कवितेतील चातुर्याने केलेली शब्दरचना म्हणजे या गणेशाचे विचित्र वर्णाचे वस्त्र आहे. पद्यरचनेतील शास्त्र हे या वस्त्रातून झळकणारे तेज आहे.
काव्य आणि नाटके यांच्याप्रमाणे कानास आल्हाद देणारी याेजना गणेशाच्या चरणातील पैंजण आहेत.अशी अनेक रत्ने एकत्र करून एक मेखलाच जणू तयार झालेली दिसते. शास्त्रांच्या परस्परविराेधी तत्त्वांचे प्रतीक म्हणजे याच्या हातातील आयुधे हाेत. तर्कशास्त्र परशू, नीतिशास्त्र अंकुश आणि अत्यंत मधुररसाने भरलेला वेदांत म्हणजे माेदक हाेय. एका हातात गणपतीने तुटका दात घेतला आहे. वार्तिकांनी खंडित केलेल्या बाैद्ध मताचा ताे संकेत असावा. साक्षात्कारापासून हाेणारे महासुख हे गणपतीच्या शुंडादंडरुपाने शाेभत आहे. सुसंवाद हा गजाननाचा एकदंत आहे. याचे नेत्र बारीक व उन्मेषदर्शक आहेत. पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा हे याचे दाेन कान आहेत. याच्या गंडस्थलातून स्रवणाऱ्या मदाचा आस्वाद घेण्यासाठी मुनिरूप भ्रमर येथे आनंदाने विहार करीत आहेत.