पत्र एकाेणिसावे
प्रिय जानकी, सप्तरंगी विचाराने भरलेले तुझे पत्र पावले.आपली ही पत्रे वाचून लाेक माझ्यावर पत्रांचा पाऊस पाडतात. एका बड्या अधिकाऱ्याने मला लिहिले : ‘‘रानडेसाहेब! नवराबायकाेंची पत्रे वाचू नये असे म्हणतात, पण रामजानकीची पत्रे आम्ही अगदी आवडीने वाचताे. गीता म्हणजे फार गहन अशी माझी समजूत हाेती. पण गीतेच्या गाभाऱ्यात गेल्यापासून माझी खात्री झाली की, आपले जीवन जास्तीत जास्त सुखी करण्याकरता गीतेसारखा दुसरा ग्रंथ नाही.जीवनातील निरनिराळ्या समस्या आपण इत्नया सुबाेध भाषेत साेडवून देता की, त्यामुळे माझी पत्नी आपली पत्रे ताेंडपाठ करते. आपण त्या पत्रांचे पुस्तक प्रसिद्ध करावे अशी माझी नम्र विनंती आहे.’’ तू आपल्या पत्रात लिहितेस - ‘गीता म्हणजे तुमचा जीव की प्राण. गीता वाचून तुम्हाला वाटते - देव ना काशीत. ना रामेश्वरात.
ताे आहे आपल्या अंत:करणात.तुम्ही केव्हा केव्हा खालील संस्कृत श्लाेक म्हणता.उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यानधारणा । अधमा प्रतिमापूजा तीर्थयात्रा अधमाधमा ।। (सहजावस्था उत्तम, ध्यानधारणा मध्यम, प्रतिमापूजा अधम व तीर्थयात्रा अधमाधम.) मला तर काशीयात्रा करावी असे फार वाटायचे. माझा विचार तुम्हाला कितपत आवडेल त्याबद्दल मला शंका वाटायची.पण मी काशीयात्रेबद्दल तुमच्याजवळ हट्ट धरला. माझा असाअनुभव आहे की हट्ट सात्त्विक असेल तर ताे पुरवला जाताे. हट्ट राजस असेल तर काळवेळ पाहून तुम्ही हट्ट पुरवता व हट्ट तामस असेल तर ताे अजिबात पुरवला जात नाही.माझा हट्ट सात्त्विक का राजस हे मला माहीत नाही. पण तुम्ही माेठ्या आनंदाने माझा हट्ट पुरवला व यात्रेपूर्वी मी व येसूवन्स आजारी असल्यामुळे तुम्ही आमची फार फार काळजी घेतली व आपण तिघेजण काशी-पुरी रामेश्वर यात्रा पुरी करून आलाे. त्याबद्दल तुमची जितकी स्तुति करावी तितकी थाेडीच आहे.
पत्राच्या पुढच्या भागात तू माझी खूप स्तुती केली आहेस.पण तू असे लक्षात घे कीस्तुती ही सदासर्वदा कुमारीच राहते. आपल्या यात्रेत तू कन्याकुमारी पाहिलीस. स्तुती ही खरी कन्याकुमारी असते.ती चांगल्या लाेकांना वरणेस तयार असते. पण चांगले लाेक तिला पसंत करत नाहीत. वाईट लाेक तिला पसंत करतात व ते तिच्याशी लग्न करण्यास एका पायावर तयार असतात, पण स्तुती त्यांना पसंत करत नाही, परिणाम असा हाेताे की, स्तुतीचे लग्न हाेत नाही व ती सदासर्वदा कुमारीच राहते. म्हणूनच संस्कृत कवी म्हणताे - अद्यापि दुर्निवारं स्तुतिकन्या वहति काैमारम् । सद्भ्याे न राेचते साऽसन्ताऽप्यस्यै न राेचंते ।। अशा परिस्थितीत मी जर चांगला असेन तर तू माझी स्तुती करता कामा नये.तू आपल्या पत्रांत लिहितेस - ‘‘तुम्ही म्हणता की जाे खरा भ्नत आहे ताे स्तुती-निंदा समान मानताे. मला वाटते अशी तयारी हाेणे फार अवघड आहे.