जेणे परमार्थ वाढे ।आंगी अनुताप चढे । त्या नाव ग्रंथ ।।2।।

    17-Jun-2023
Total Views |
 
 

saint 
मूर्तीपूजकांना मूर्तीची, संगीततज्ज्ञाला सूर आणि तालबद्ध संगीताची, कामी माणसाला काेकशास्त्राची, जारणमरण करणाऱ्याला मंत्रतंत्राची अशीही वेगवेगळी गाेडी असू शकते. मात्र सत्प्रेरित ज्ञानी माणूस ज्ञानाचा, भाविक भजनाचा, साधन साधनाचा, परमार्थी परमार्थाचा, विद्वान अध्ययनाचा भुकेला असताे.हे भेदाभेद वर्णन करतानाच ‘टवाळा आवडे विनाेद’ हे श्रीसमर्थांचे प्रसिद्ध वचनही येते. ते म्हणतात की थट्टेखाेर विनाेदी माणसाला विनाेद आवडताे तर उन्मत्ताला तंटेबखेडे आणि व्यसनांची आणि तामसी प्रकृतीच्या माणसाला वाईट कर्मांचीच आवड असते.माणसांचे असे कितीतरी वेगवेगळे प्रकार व त्यांच्या विविध आवडी सांगता येतात आणि ते ते आपल्या आवडीचे ऐकतात किंवा तसेच ग्रंथ वाचतात.
 
परंतु जसे गाेडीवाचून गाेडपण नसते, सुंदर नाकाशिवाय साैंदर्य शाेभत नसते तसे परमार्थाशिवाय असणारे ज्ञान व्यर्थच असते.ज्यात परमार्थसाधन नाही त्याला श्रवण म्हणूच नये. कारण आत्मज्ञानाशिवाय असणारे इतर सर्व श्रवण व ग्रंथ ही निव्वळ करमणुकीची साधने समजली पाहिजे. कारण त्यातून निरंतरचे हितकारक काहीही साध्य हाेत नाही. म्हणून श्रवण, मनन आणि वाचन करताना ते परमार्थ ग्रंथांचेच केले पाहिजे असे आग्रहपूर्वक सांगून श्रीसमर्थ म्हणतात की, त्या ज्ञानाशिवाय इतर ग्रंथ कितीही चांगले असले तरी आत्मज्ञान हाेण्यासाठी ते उपयाेगी पडत नाहीत. म्हणून त्यांचा त्याग करून साधकाने अद्वैतग्रंथांचे श्रवण करावे व विवेकाने आत्मज्ञानी बनावे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299