काय सांगाे तुझ्या चरणांच्या सुखा। अनुभवा ठाऊका नाहीं तुज ।।

    16-Jun-2023
Total Views |
 
 

saint 
जगाच्या पाठीवर अशी अनेक माेठी माणसं आहेत, की जी खराेखच खूप माेठी आहेत. पण त्यांचा माेठेपणा त्यांनाच माहिती नसताे. कारण आपण माेठे आहाेत ही कल्पनाच त्यांच्या मनाला स्पर्श करीत नाही. म्हणूनच ही माणसं खऱ्या अर्थाने माेठी आहेत. पंढरीचा पांडूरंग जगाच्या कल्याणासाठी उभा असला तरी संत, महात्म्यांच्या सेवेत जायला विसरत नाही. कर्तव्य हाच त्याचा आधारस्तंभ आहे. कर्तव्य, समत्व, बंधुत्व, निस्वार्थ प्रेम जाेपासण्याच्या हेतुने उभ्या असलेल्या या पांडूरंगाला स्वत:ची महती माहिती नाही. सर्व संत महात्म्यांना खांद्यावर, कमरेवर, डाेक्यावर, हृदयात घेणाऱ्या या पांडूरंगाचे समत्व, बंधुत्व, प्रेमाचे पूर्ण ओझे पेलणाऱ्या त्याच्या पायाची महती त्यालाच माहिती नाही. त्याचे पाय मागे-पुढे नाहीत किंवा चढ उतारावर नाहीत.
 
तर त्याचे पाय पूर्णत: सम पातळीवर एकमेकांना पूरक असे किंवा जाेडल्यासारखे आहेत. सर्व चांगल्या गाेष्टीची जाेड करणाऱ्या, समत्व जाेपासणाऱ्या या पायाची महती त्याला माहिती नसली तरी आम्हा भक्तांना माहिती आहे. हे सांगतांना तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगाे तुझ्या चरणांच्या सुखा। अनुभव ठाऊका नाहीं तुज ।। भारताच्या काना काेपऱ्यातून येणारे लाखाें भाविक संसाराच्या विचाराचे डाेक्यातील ओझे पांडूरंगाच्या पायावर टाकतात. जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448