सूर्यें अधिष्ठिली प्राची। जगा राणीव रे प्रकाशाची। तैशी वाचा श्राेतयां ज्ञानाची। दिवाळी करी।। 15.12

    16-Jun-2023
Total Views |
 
 

Dyaneshwari 
 
दैव अनुकूल असले की, श्रीगुरू कसे प्रसन्न हाेतात याचे आणखी विस्ताराने वर्णन ज्ञानेश्वर येथे करीत आहेत. ते असे म्हणतात की, सूर्य पूर्वेला उगवला की ताे सर्व जगाला प्रकाशाचे राज्य देताे. वाणी श्राेत्यांना ज्ञानाची दिवाळी करते. ज्ञानाची दिवाळी हे ज्ञानेश्वराचे माेठे आवडते शब्द आहेत. दीप लावून दिवाळी करण्यापेक्षा ज्ञानी हाेऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र करणे ही खरी दिवाळी असे त्यांना वाटते.अशी दिवाळी ज्ञानामुळे श्राेत्यांना प्राप्त झाली की, ज्ञानेश्वर म्हणतात मला असे वाटते की, या निरूपणापुढे नादब्रह्म देखील ठेंगणे हाेते. यापुढे माेक्षालासुद्धा शाेभा प्राप्त हाेत नाही.श्रवणसुखाच्या मांडवामध्ये सर्व जगाला वसंतॠतूचा अनुभव देणारी निरूपणाची वेली चांगली भरास येते. या निरूपणात ज्या देवाचा पत्ता लागत नाही, जेथून मन वाचेसह परतिफरते, ताे देव या दैववान पुरुषाच्या स्वाधीन हाेताे हे केवढे आश्चर्य आहे!
 
जे ज्ञानाला कळत नाही, ध्यानाला सापडत नाही, असे ब्रह्मज्ञान त्याच्या बाेलण्यात प्रकट हाेते.गुरूंच्या चरणरूपी कमलातील सुगंध ज्यावेळी प्रकट हाेताे, त्यावेळी असे भाग्य वाणीला प्राप्त हाेते. ज्ञानेश्वरमहाराज काैतुकाने म्हणत आहेत की, यासंबंधी आणखी काय सांगू? माझ्याशिवाय इतका सुदैवी काेणी नाही. कारण की मी श्रीगुरूंचे तान्हे मूल आहे. आणि त्यांनाही एकच मूल आहे.त्यांच्या र्कृंपेला मी एकच ठिकाण आहे चातक पक्ष्यासाठी मेघ जसा वृष्टी करताे, त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्याकरता केले आहे. म्हणून माझे रिकामे ताेंड जरी बडबड करू लागले तरी ते गीतेसारख्या ब्रह्मरसाने भरलेले गाेड शास्त्र सहज प्रकटते.अनुकूल दैवामुळे वाळूची रत्ने हाेतात. जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करून जाताे. त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझा अंगीकार केला आहे.