चांगल्याच्या निर्मितीसाठी आपण साैंदर्यवान, धनवान असावेच लागते असे नाही. शिंपले माेत्याच्या तुलनेत निश्चितच साैंदर्यवान नसते. तरीपण त्याने केलेली माेत्याची निर्मिती सर्व साैंदर्याला मागे टाकते. त्याप्रमाणे आपण दिसायला कसे आहाेत किंवा काेण आहाेत याचा विचार न करता मनाचे साैंदर्य वाढवून सकारात्मक वृत्तीने कार्य करू गेल्यास आपल्या हातून निश्चितच कांहीतरी चांगले निर्माण हाेऊ शकते. आपल्यावर समाजाचे कांही ऋण हे आहेतच.त्या ऋणाची कांही प्रमाणात का हाेईना पण परतफेड करण्याचा प्रयत्न आपण करायलाच हवा. संत, महात्म्यांना समाजाने खूप छळले तरीही त्यांनी सुंदर अशा ग्रंथांची निर्मिती सामाजासाठी केली.
त्यांचे ग्रंथ, मार्गदर्शन आपल्यासाठी उपलब्ध नसते तर कदाचित आमच्यात आहे तेवढी मानवता दिसली नसती. संसारात अडकलेल्या जीवाला मीतून बाहेर पडणे तसे कठीण आहे. पण प्रयत्नाअंती हे ही साध्य हाेऊ शकते. समाजासाठी नाही तर किमान आपण आपल्या स्वत:साठी, कुटुंबासाठी तरी नीतीनियमपूर्वक कांही चांगले निर्माण करताे का? याचा विचार करून वागले तरी पुरे आहे. कारण आपण व कुटुंब समाजाचा एक घटक आहेात.नितीनियमपूर्वक झालेली आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती समाजाच्या प्रगतीला हातभार लावू शकते.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448