कांही लाेक प्रसंगाचा विचार न करता त्यांना वाट्टेल ते बाेलतात. सुख-दु:खाचा प्रसंगही त्यांच्या मनाला स्पर्श करीत नाही. स्मशानात टिंगलटवाळी करणारे, मंगलप्रसंगी दु:खद, क्लेशकारक बाेलणारे कांही कमी नाहीत. कसलाही प्रसंग असला तरी आपले ताेंड बंद ठेवणारेही आहेत.प्रसंगानुरूप ताेंड बंद ठेवणे याेग्य असले तरी सातत्याने बंद ठेवणे याेग्य नसते. सासू-सासरे वाट्टेल ते आराेप करीत असतील तर सुनेने गप्प न राहाता नम्रपणे का हाेईना पण आपली बाजू मांडायला हवी. वरीष्ठ आहेत म्हणून गप्प राहून कांहीही आराेप स्विकारणे चुकीचे असते.
समाेरच्याचा राग शांत हाेइपर्यंत गप्प बसणे याेग्य असले तरी आपली बाजूच मांडूच नये असे मात्र नाही. ज्याच्याबद्दल आपण सातत्याने अपशब्द बाेलत आहाेत, त्याचे जागेवर आपण असताे तर? असा विचार आपण करायला हवा. निसर्गाने आपणाला चांगले विचार, भावना व्यक्त करण्यासाठी वाचा दिली आहे. वाचेने हाेणारे शाब्दीक घाव हे शस्त्राने हाेणाऱ्या घावापेक्षा भयानक व तीव्र असतात.शस्त्राचे घाव औषधपाणी करून बुजवता येतात पण शब्दाने हाेणारे घाव बुजवता येत नाहीत.शस्त्राने शरीरावर जखमा हाेतात आणि शब्दाने ह्रदयावर, मनावर जखमा हाेतात हे लक्षात असू द्यावे.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448