जगात असे अनेक लाेक आहेत की, जे बाेलतात एक आणि करतात वेगळेच. तसेच वरकरणी दाखवितात वेगळे आणि आतून वागतात वेगळे. अशा दाखविणाऱ्या वेगळे आणि वागणाऱ्या वेगळे लाेकांपासून अनेकांना नुकसान पाेहचते. चेहऱ्यावरचे हावभाव, ओठावरचे शब्द समाेरच्याचे मन जिंकून जातात, आणि अशा मन हरवून बसलेल्यांना फसव्या लाेकांची शिकार व्हावी लागते.समाजात जे फसवणुकीचे प्रकार आपणाला पहायला मिळतात ते प्रामुख्याने ओठावर एक आणि पाेटात एक भाव ठेवून वागणाऱ्यांमुळेच. स्वार्थांची भावना जाेपासणारे लाेक समाेरच्याचा विश्वासघात करून जातात.
उघड-उघड खाेटारडे वागणाऱ्यांपेक्षा असे लाेक भयानक असतात. माणसाच्या भावनेशी खेळणाऱ्या अशा लाेकांचा सहवास दु:खदायी असताे.ओठात आणि पाेटात वेगवेगळे भाव जाेपासणारे हे लाेक माणसाला तर जाऊच द्या पण साक्षात भगवंताला फसविण्यातही मागे नसतात. अशा फसव्या लाेकांची आपणाला कधीच संगत हाेऊ नये, या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणें पाेटीं । भाव आणीक जया हाेटीं ।। असे वागणे काेणासाठीही हितावह नसते.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448