ज्ञानेश्वरांना वेद, उपनिषदे, भगवद्गीता, महाभारत, व्यास, श्रीकृष्ण इत्यादीविषयी माेठा अभिमान आहे. एकदाच वेदांची उणीव दाखविताना ज्ञानेश्वर म्हणाले की, वेद कृपण आहेत. कारण ते तीन वर्णांच्याच कानी लागले. परंतु वरील ओवीत ज्ञानेश्वर वेदांना तीनही जगांची माऊली असे मानतात. या वेदांच्या आज्ञेची भीड आपण मानावी.ज्याला आत्महिताची चाड आहे, जाे इंद्रियांचे लाड वाढवीत नाही, जाे दिलेले वचन पाळताे, कामक्राेधापासून जाे दूर हाेताे, त्याला ऐहिक व पारलाैकिक सुख भाेगावयास मिळते. पण कसे हाेते पहा. माशांच्या लाेभाने ब्राह्मण काेळ्यांच्या जातीत शिरताे आणि काेळीही त्याला स्वीकारीत नाहीत.त्याप्रमाणे विषयी लाेकांना परलाेक पारखा हाेताेच. पण इहलाेकही त्यांना सुखदायक वाटत नाही.
याप्रमाणे परलाेक नाही, इहलाेक नाही, ऐहिक विषयांचा भाेग, नाही. तेथे माेक्षाचा विषयच कशाला? म्हणून अर्जुना, ज्याला स्वत:चे हित साधावयाचे असेल त्याने वेदांच्या आज्ञेच्या बाहेर जाऊ नये.पतीच्या मताप्रमाणे वागून पतिव्रता स्वत:चे कल्याण प्राप्त करून घेते किंवा गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून शिष्य आत्मानुभव घेताे, त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य सर्व पुरुषार्थांचा मालक हाेऊन वेदांना मस्तक वाकविताे. शास्त्राने एकदा टाकावे म्हटले की राज्यही एखाद्या गवताच्या काडीप्रमाणे साेडून द्यावे. वेदशास्त्राची एवढी प्रीती असल्यावर अकल्याण कसे हाेणार ? कारण ही वेदमाता अहितापासून काढणारी, हित करून वाढविणारी अशी आहे. याश्रुतीशिवाय, म्हणजे वेदाशिवाय जगाला दुसरी माऊली नाही. म्हणून हिची हेळसांड काेणी करू नये. अर्जुना, तूसुद्धा एकनिष्ठेने हिचे सेवन कर.
म्हणजे तुझे धर्मानुज हे नाव सार्थ हाेईल.