गीतेच्या अठराव्या अध्यायाच्या शेवटी शेवटी गीतेची फलश्रुती आली आहे. श्रद्धायुक्त अंत:करणाने मत्सररहित हाेऊन जाे मला येऊन मिळेल त्याला सर्वकाही प्राप्त हाेईल. गीतेच्या श्रवणाने अंत:करण शुद्ध हाेईल.सर्व पापे नाहीशी हाेतील. अरण्यात अग्नी पेटल्यावर सर्व प्राणी इकडेतिकडे पळतात. सूर्याच्या उदयाबराेबर अंधार नाहीसा हाेताे. त्याप्रमाणे गीतेचे शब्द कानांत पडल्याबराेबर सृष्टीचे आरंभापासूनचे पाप नाहीसे हाेते.सर्व जीवन शुद्ध, स्वच्छ व पुण्यरूप हाेते. धर्माचा उत्कर्ष हाेताे. स्वर्गतुल्य ऐश्वर्य भाेगावयास मिळते अर्जुना, ऐकणाऱ्याला व वाचणाऱ्याला याप्रमाणे गीता ब्रह्मानंदाची प्राप्ती करून देते. अर्जुना, हे सर्व तू नीट ऐकले आहेस ना? तुझे अज्ञान दूर झाले ना? माेह नष्ट झाला ना? मी सांगितलेले सर्व तुझ्या ध्यानी आले ना?
अमुक एक कर्म मी करीन व अमुक एक करणार नाही, हा भाव नाहीसा झाला ना? देवाचे हे बाेलणे ऐकून अर्जुन आनंदरूपी सागरात विरघळून जाईल व मग बाेलणेच खुंटेल या भीतीने देवांनी अर्जुनाला भेदाच्या भावनेवर आणले.अर्जुन पूर्णब्रह्म झाल्यानंतर श्रीकृष्ण काेणाला काय सांगणार? अर्जुनाला प्राप्त झालेली पूर्णस्थिती त्यालाच बाेलावयास लावली. मी ब्रह्म आहे असे वाटण्यापेक्षा जगच ब्रह्मरूप आहे अशी समजूत पटली तरी त्याचे ब्रह्मपणसुद्धा आपाेआप विसरून जाते. या भूमिकेवर अर्जुन ‘मी अर्जुन आहे’ या भावनेने उभा राहिला.त्याच्या अंगावर सर्वत्र राेमाचं उठले. अंगावर आलेल्या घामाचे बिंदू जिरवून ताे आपल्या ठिकाणीच स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डाेळ्यांतून आनंदाश्रू वाहात हाेते. वाचा विस्कळीत झाली हाेती.