शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने, आणि द्वापारयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती हाेते. परंतु कलियुगामध्ये त्यांपैकी काहीच साध्य हाेणे शक्य नसल्याने, भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वत: अनुभव घेतला आणि लाेकांना सांगितले की, साडेतीन काेटी जप केला असता चित्तशुद्धि हाेते; आणि तेरा काेटी जप केला असता भगवंताचे दर्शन हाेते. एकवेळ मला आपण महत्त्व देऊ नका, पण ज्या थाेर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगताे, ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथमहाराज, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्वामी, यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बाेलतील हे शक्यच नाही. वेदांना जे परमात्मस्वरूप अगाेचर आहे ते स्वरूप संत तद्रूपत्वाने जाणतात.
सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून ‘नाम घ्या’ असे सांगितले.वेद भगवंताचे वर्णन करतात. नामदेखील भगवंताचेच वर्णन-अस्तित्व-प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी ‘हरि: ॐ’ असते, ते नामच आहे. जसा वेद हा अनादि तसनाम हेही अनादि. जसा वेद हा अपाैरुषेय. तसे नाम हेही अपाैरुषेय. जसा वेद हा अनंत तसे नाम हेही अनंत आहे.प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले, म्हणून ते अनादि साधन आहे.इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहारविहाराची बंधने आहेत. भगवंताच्या नामाला ती नाहीत.नाम हे आगंतुक नाही.आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जाे ॐ चा ध्वनि केला तेच नाम हाेय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की, आपण नाम घेत जावे.
किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती हाेय. ती करीत असताना, म्हणजे वेद म्हणत असताना, आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे.अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे.आपण नेमके तेवढेच विसरताे. नाम घेणाऱ्या लाेकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी हाेण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहाता त्या कर्माच्या जाेडीला भगवंताचे नाम घ्यावे. भगवंताला लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेताे, पण खरी अनन्यता असेल तर पाेटभर पुरविताे.इतक्या तन्मयतेने नाम घ्या की, ‘मी नाम घेताे आहे’ हे सुद्धा विसरून जा