संसारात अडकलेला जीव कळत न कळत ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, काम, क्राेध, लाेभ, माया आदींचा शिकार हाेताे. त्याला आपले खरे हित कशात आहे हे कळत नाही. ताे नाशवंत व भाैतिक सुखालाच खरे शाश्वत सुख समजून बसताे. त्याची स्वत:ची स्वत:वर सत्ता चालत नाही. तरीपण ताे इतरांवर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करताे. त्याचा देह एके दिवशी त्याची साथ साेडताे.हे सत्य असले तरी आयुष्यभर या देहाच्या रक्षणासाठी तसेच इंद्रियांचे लळे पुरविण्यासाठी हा जीव नकाे ते करण्यात मागे राहत नाही. थाेडक्यात स्वत:चा, स्वत:च्या अस्तित्वाचा खरा परिचय न झाल्याने हा जीव माया, माेहात अडकून स्वत:ला चिंतेत ढकलून देताे; पण संसारात काही लाेक असेही पाहायला मिळतात की ज्यांना त्यांचा खरा परिचय झालेला आहे. त्यामुळे या जीवांना कसल्याही प्रकारची चिंता नसते. यांना भगवंताकडून काही हवेही नसते. यांना चिंता नाही, हे उपवाशी मरत नाहीत. यांना धन, द्रव्याची, गाई-म्हैशी प्राप्तीची गरज नाही. तरीपण हे लाेक विठ्ठलाच्या समचरणी सुख मानतात. या अनुषंगाने बाेलताना तुकाराम महाराज म्हणतात, नाहीं काहीं चिंता मरताे उपवासी । अथवा त्या म्हैसी गाई व्हाव्या ।। जय जय राम कृष्ण हरी।। -डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448