तीर्थक्षेत्र म्हटले की आमच्या डाेळ्यासमाेर पवित्रता उभी राहते. संसाराच्या दगदगीतून माणसाला सुख समाधानासाठी, मनावरील ताण कमी करण्यासाठी तीर्थक्षेत्राला जावे वाटते.काही लाेक असेही असतात की जे केवळ भाव म्हणून तीर्थक्षेत्राला जातात. तीर्थक्षेत्राला गेले म्हणजे मनावरील ओझे कमी हाेतेच, असे नसले तरी काही प्रमाणात का हाेईना पण माणूस समाधानी हाेताे. असे समाधानी हाेण्यामागे त्याची मानसिकता कारणीभूत असते. काही लाेक तर आयुष्यातील बराच वेळ केवळ तीर्थयात्रा करण्यात घालवतात. पंढरीचे क्षेत्र म्हणजे पंढरपूर हे असे तीर्थक्षेत्र आहे की, जेथे जाणाऱ्यास इतर तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज पडत नाही.
सर्व तीर्थक्षेत्राला जाण्यात वेळ घालण्यापेक्षा एका पंढरपुरी जावे आणि पांडुरंगाचे दर्शन घेऊन सुखी व्हावे. पंढरीच्या चरणात सर्व तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतल्याचा आनंद देण्याची ताकद आहे. हे चरण सर्व तीर्थक्षेत्राची पवित्रता धारण करतात.या चरणाचे दर्शन घेणाऱ्याला अनंत तीर्थाचे दर्शन घेतल्याची अनुभूती येते. या अनुषंगाने समचरणी उभा असलेल्या विठ्ठलाच्या प्रेमापाेटी बाेलताना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे विठ्ठलपायी । अनंत तीर्थे घडली पाहीं ।। जय जय राम कृष्ण हरी -डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास,