तै विपायें घुणाभर पड़े। टाळिये काउळा सांपडे। तैसें तामसां पर्व जाेडे। पुण्यदेशीं।। (17.301)

    23-May-2023
Total Views |
 
 
 

Dyaneshwari 
 
सात्त्विक दानानंतर ज्ञानेश्वर राजस व तामस दानांचे वर्णन करतात.दुभत्याची इच्छा ठेवून ज्याप्रमाणे गाय पाळावी, अहेरावर दृष्टी ठेवून ज्याप्रमाणे साेयऱ्याधायऱ्यांना आमंत्रण द्यावे. व्याज आधी घेऊन दुसऱ्याचे काम करावे, द्रव्य घेऊन औषध द्यावे, त्याप्रमाणे राजस दानाची स्थिती असते.असा मनुष्य दान देऊन फळाची इच्छा करताे. दान दिलेला गेला की दान देणारा जणू चाेराने सर्व लुटून नेले अशा रीतीने मनात झुरताे. असे हे दान राजस हाेय. यानंतर तामस दानाचे वर्णन ज्ञानेश्वर करतात. म्लेंच्छांच्या देशात, अरण्यात, छावणीत शहरातील चव्हाट्यावर, संध्याकाळी, रात्री दान देणे याेग्य नाही, चाेरून आणलेल्या द्रव्याचे दान करू नये. भाट, गारुडी, वेश्या, जुगारी हे भुलवणारे असतात. रूपाची व नृत्याची भर पडून डाेळे फसले जातात.
 
लांचा आणि चंदनादि सुगंधांचा वास वाढून जणू भ्रमाचा वेताळच प्रकट हाेताे. मग लुटून आणलेले द्रव्य ताे अन्नछत्र उघडून वाढू लागताे. हे सर्व दान तामस दान हाेय.अशा दानामुळे दैवयाेगे एखादी चांगली प्राप्ती हाेईल.यासाठी ज्ञानेश्वर एक समर्पक दृष्टांत देतात. लाकडे काेरणारा घुणा नावाचा किडा असताे. ताे सहज काेरण्याच्या क्रियेत क्वचित् एकादे अक्षर निर्माण हाेते.त्याप्रमाणे तमाेगुणाला पुण्यस्थल व चांगला याेग यांची क्वचितच प्राप्ती हाेते. पण याच्या मनात श्रद्धा नसते. ताे नमस्कारासाठी शरीर वाकवत नाही. सत्पात्र ब्राह्मणाला आसन देत नाही. मग गंध, अक्षदा यांचे नाव कशाला? या तमाेगुणाच्या ठिकाणी अरे तुरे असे बाेलण्याची पद्धत आहे. थाेडेसे देऊन ताे वाईट शब्द बाेलताे व अपश्रेय पदरात घेताे.