जाे उपाधीचा अंत । ताेचि जाणावा सिद्धांत ।।1।।

    22-May-2023
Total Views |
 
 

saint 
 
या समासात शुद्ध ब्रह्माचे अतिशय तर्कशुद्ध निरूपण श्रीसमर्थांनी केलेले आहे. तर्कशास्त्रा प्रमाणे एखादी गाेष्ट सिद्ध करावयाची असल्यास आधी तिच्यावरील आक्षेप सांगावयाचे; मग ते आक्षेप खाेडून काढून अंतिम निष्कर्षाला यावयाचे अशी जी शास्त्रीय पद्धत आहे, तिचाच अवलंब येथे केला आहे. एखाद्या खाणीतून रत्ने काढावयाची असतील तर त्यासाठी आधी खूप खणून माती काढावी लागते व मगच रत्ने हाती लागतात. त्याचप्रमाणे वेदांतामध्ये जी चाैदा ब्रह्मे सांगितलेली आहेत, त्याहून शुद्ध ब्रह्म कसे वेगळे, जास्त व्यापक व अंतिम सत्य आहे. हे सांगण्यासाठी श्रीसमर्थांनी चाैदा ब्रह्मांचे स्वरूप व त्यांचे अपुरेपण सांगत श्राेत्यांना शुद्ध ब्रह्मस्वरूप दाखवले आहे.या चाैदा ब्रह्मांच्या खुणेच्या वाटेने गेल्यावर श्राेत्यांना शुद्ध ब्रह्माचा सिद्धांत आकलन हाेईल असे सांगून या समासाचा प्रारंभ केलेला आहे.
 
पहिले शब्दब्रह्म म्हणजे शब्दांनी व्यक्त केलेला अनुभव हाेय. पण तेथे प्रत्यक्ष ब्रह्मानुभव नसल्याने ते अपूर्ण आहे. दुसरे ‘ॐ’ हे एकाक्षर ब्रह्म हाेय. परंतु ब्रह्माची विशाल कल्पना आणि तीही एका शब्दात सांगणे हाच याचा अपुरेपणा आहे. तिसरे ‘खं’ ब्रह्म म्हणजे आकाश हेच श्रुतींनी ब्रह्मस्वरूप मानलेले आहे; पण ते शून्याकार आणि अशाश्वत आहे ही त्याची अपूर्णता आहे, कारण शुद्ध शाश्वत ब्रह्मज्ञानाने शून्यही नाहीसे हाेते. चाैथे सर्वब्रह्म म्हणजे सर्व दृश्य जगात अनुभवास येणारी तत्त्वे हाेत. परंतु पंचमहाभूतांची ही तत्त्वे नाशवंत असल्याने अपूर्णच आहेत. विश्व व्यापाराला चैतन्याने चालविणारे ते पाचवे चैतन्यब्रह्मसुद्धा विश्वच मिथ्या असल्याने मिथ्याच समजले पाहिजे. चैतन्याला आधार असणारी सत्ता हे सहावे सत्ताब्रह्म म्हणतात. पण शुद्ध ब्रह्मरूपात भेदाभेदच नसताे म्हणून सत्ताब्रह्मही थिटेच पडते.