सकळास मिळाेन ब्रह्म येक । रंक अथवा ब्रह्मादिक ।।1।।

    19-May-2023
Total Views |
 
 
 
saint
 
‘ब्रह्मनिरूपण’ या सातव्या दशकातील दुसऱ्या समासाचा प्रारंभ श्रीसमर्थ शास्त्राप्रमाणे ब्रह्म निर्गुण, निराकार, नि:संग, निर्विकार आहे असे सांगून करतात.ब्रह्म अनेकांमध्ये एकत्वाने वास करणारे, सर्वांना व्यापणारे विशाल, न चळणारे अच्युत आणि अंत न लागणारे असे अनंत आहे.सर्वव्यापक असूनही ते दिसत नाही आणि ज्ञानेंद्रियांनी ते जाणून घेऊ म्हणून जाणता येत नाही. तर केवळ सद्गुरूच्या कृपेनेच त्याची प्राप्ती हाेऊ शकते. ब्रह्मज्ञान म्हणजे अवीट आनंदाचे काेठार आहे; पण त्याला आपल्या देहबुद्धीचे कुलूप असल्यामुळे सद्गुरूकृपेच्या किल्लीने ते उघडल्याशिवाय ताे आनंद मिळत नाही. ते मन आणि बुद्धी यांच्याहीपूर्वी हाेते आणि जेव्हा त्या दाेन्हीहूनही आपण स्वत:ला स्वतंत्र करू तेव्हाच ते आपल्या जाणिवेच्या कक्षेत येऊ शकते.आपले विकार, आशा, तृष्णा, लाेभ, देहावर जडलेले प्रेम हे साेडल्यावरच त्याचा मार्ग खुला हाेताे.
 
श्रीसमर्थांना ब्राह्मणांचे पक्षपाती म्हणण्याची आजकाल फॅशन आहे. प्रत्यक्षात त्यांचे विचार कसे समतेचे हाेते हे या समासात अगदी स्पष्टपणे दिसू शकते. ते म्हणतात ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यामध्ये उच्च व नीच जातीच्या जन्माचा फरक नाही.राजा आणि रंक यांच्यातील फरकही नाही आणि स्त्रीसुद्धा कनिष्ठ नाही तर पुरुषाइतकीच ब्रह्मज्ञानाची हक्कदार आहे. ब्राह्मण किंवा इतर काेणत्याही जातीचा, राजापासून रंकापर्यंत, स्त्रीपुरुष हा भेदही न राहता ब्रह्मपद काेणालाही प्राप्त हाेऊ शकते.ब्रह्मज्ञान एवढे विशाल आहे की त्याच्यासमाेर काेणताही भेदाभेद नाही. त्या काळात ब्राह्मणवर्गात साेवळे ओवळ्याचे प्राबल्य हाेते, जे आज शिल्लकही नाही.