आनंद कशामुळे मिळताे ?

    19-May-2023
Total Views |
 
 

Gondavlekar 
 
ताे मिळविण्यासाठी काय करावे?सृष्टी शून्यापासून निर्माण झाली.आपलीही मूळ स्थिती तीच आहे, म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा?; म्हणजेच, स्वानंदांत स्वस्थ राहावे. पण ते आपल्या हातून हाेत नाही, कर्म करीतच राहावे असे वाटते. प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसताे; पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली नाही तर काय उपयाेग? याकरितां मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावे. आनंद कुणाला नकाे आहे? आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु ताे मिळविण्याकरिता जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही. नाेकरी नकाे आणि खायला हवे, हे कसे शक्य आहे? खराेखर प्रपंचाच्या या अगणित उपाधीतून सुटून जाे स्वास्थ्याकडे जाताे ताे धन्यच हाेय.
 
मनाच्या विरुद्ध गाेष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येताे; याकरिता, आपल्या इच्छेविरुद्ध घडले तरी माझे स्वास्थ्य बिघडणार नाही, इकडे पाहावे. याला एकच उपाय आहे, आणि ताे म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणे. काेणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गाेष्ट घडावी, ही बुद्धीच ठेवू नये.जाेपर्यंत हाव आहे ताेपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहाअसे समजावे. महत्त्वाकांक्षा खुशाल धरावी, पण त्यामुळे मनाला त्रास हाेऊ देऊ नये. भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे म्हणावे, आणि अभिमान साेडून कर्म करीत राहावे; प्रयत्न करून जे काही हाेते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे. कर्तेपणाचा अभिमान साेडल्यानेच स्वास्थ्य लाभते.
 
मागे घडलेल्या चांगल्या-वाईट गाेष्टी आठवत राहणे यामुळे आनंदात बिघाड येताे. तसेच, उद्याची काळजी करीत राहाणे यामुळेही मनाच्या स्वास्थ्यांत व्यत्यय येताे. हाेते-जाते ते सर्व भगवंताच्या इच्छेने हाेते हे मनाने पक्के ठरविल्यावर मग विनाकारण काळजी का करावी ? विकार जिंकले अशी ज्याला आठवण राहते त्याने ते जिंकले आहेत असे कसे म्हणावे ? दु:ख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे, ज्या माणसाने मनाला याेग्य वळण दिले आहे, ताे प्रत्यक्ष दुखणे भाेगीत असताना ही आनंदात राहू शकेल. म्हातारपणी तर आनंद हे माेठे शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या काेणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ हाेताे. आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामाने कृपा केली असे खचित समजावे. भगवंतासाठी एकच दान खरे आहे, आणि ते म्हणजे आत्मदान हाेय. सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती हाेणे हा आत्मदानाचाच प्रकार आहे.