प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, सभा म्हटले की श्राेता आणि वक्ता हे आलेच. शेकडाे प्रवचनं, कीर्तनं, व्याख्यानं किंवा भाषणं ऐकली तरी कांही माेजकीच आपल्या म्हणजे श्राेत्यांच्या लक्षात राहतात. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे वक्त्याचे वक्तृत्व हाेय. वक्तृत्व चांगले असेल तर श्राेत्यांच्या मनावर चांगला परिणाम हाेताे. केवळ जाेरजाेराने बाेलले, टिंगल टवाळी काढून हसवले म्हणजे वक्तृत्व भारदस्त हाेते असे नव्हे.वक्त्यांनी आपण काय बाेलताे आहाेत? आपण जे बाेलताे आहाेत ते श्राेत्यांना समजत आहे का? त्याचबराेबर श्राेत्यांना ते पचत आहे का? याचा विचार केलाच पाहिजे.
त्याचबराेबर चुकीचे किंवा अयाेग्य असूनहकेवळ अनेक लाेक ऐकत आहेत म्हणून आपणही ऐकायचे असे श्राेत्याच्या बाबतीत हाेता कामा नये. यासाठी सत्य काय आहे याची परीक्षा करून त्याची खूणगाठ बांधली पाहिजे. वक्त्याने याेग्य ते श्राेत्यांच्या पदरात दिले पाहिजे व श्राेत्याने याेग्य तेच पदरात घेतले पाहिजे. या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, अहाे श्राेते वक्ते सकळही जन । बरें पारखून बांधा गांठी ।। महाराजांच्या अभंगाचे अर्थ हे आमच्या मर्यादित बुध्दिप्रमाणे काढले आहेत. यापेक्षाही वेगळे अर्थ निघू शकतात. आमचा अर्थ अंतिम नव्हे. जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448