सत्त्व, रज, तम या गुणांपैकी तमाच्या वाढीमुळे मनुष्याची हानी हाेते. म्हणून ज्ञानेश्वर याचे वर्णन करून हा टाळावा कसा याची एक युक्ती येथे सांगत आहेत.तमाेगुणाची वाढ स्वभावत:च हाेते.दंभ, अहंकार, अभिलाष, आसक्ती यांचाच प्रभाव पडू लागताे. अशी माणसे कशी वागतात? ती शास्त्राला दूर करतात. वडीलमाणसांना व पंडितांना वेडावतात. श्रीमंतीच्या गर्वाने ते नेहमी ुगलेले असतात.दुसऱ्यांच्या अंगांत शस्त्रे खुपसून त्यांच्या रक्ताने अग्नीस अभिषेक करतात. नवसासाठी मुलांना बळी देतात. क्षुद्र दैवतांची उपासना करतात. यामुळे त्यांना स्वत:ला व इतरांना त्रासच हाेताे. समुद्रातून तरून जाण्याचे सामर्थ्य आपल्यांत नाही आणि नावेचाही आश्रय करायचा नाही, त्यांची दुर्दशाच हाेणार. वैद्याचा द्वेष करून, औषधाला झुगारून राेग कसा जाणार?
याप्रमाणे तामसी मनुष्य शास्त्रांचा धिक्कार करताे. अविचाराने वागताे. काम व क्राेध यांच्या स्वाधीन हाेताे.यांच्यामुळे सर्व जगाला दु:ख हाेते. वाचेनेसुद्धा या तामसी पाप्यांना स्पर्श करू नये. यांचा त्याग करण्यास आम्हांस एवढे बाेलावे लागले. प्रेतास स्पर्श करू नये, पण त्याला बाहेर काढण्यासाठी स्पर्श करावा लागताेच.त्याप्रमाणे तमाेगुणाचा त्याग करण्यासाठी आम्ही तमाचे एवढे वर्णन केले. पण अर्जुना, तुला या आसुरी लाेकांचा संसर्ग येईल तेव्हा तू केवळ माझे स्मरण कर. याशिवाय दुसरे प्रायश्चित नाही. हीच ती सात्त्विक श्रद्धा हाेय. हिचे चांगले जतन करावे. चांगली संगती धरावी. स्वभाव बनण्यासाठी आहाराचा विचार करावा. अन्नपाण्याचे गुणधर्म नीट ध्यानात घ्यावेत. म्हणजे अमृताचे सेवन केल्यावर जसे मरण टळते, त्याप्रमाणे सात्त्विक आहाराने चित्त शुद्ध हाेते.