चिरंतन समाधान केवळ परब्रह्म प्राप्तीमुळेच मिळते. ते समाधान कसे असते ते शब्दांनी वर्णन करून सांगावे. या श्राेत्यांच्या विनंतीला उत्तर देण्यासाठी आणि ब्रह्मरूपस्थिती ही अनुर्वाच्य म्हणजे शब्दांनी न सांगता येण्यासारखी असते हे स्पष्ट करणारा हा दहावा ‘अनुर्वाच्य’ समास आहे. आपली अशी कल्पना असते की, प्रत्येक गाेष्टीचे वर्णन याेग्य शब्द वापरून करता येते. सामान्यपणे आपल्या सभाेवताली दिसणाऱ्या वस्तूंना हा नियम लागूही पडताे. नदी, गाय, आंबा, पुस्तक, युद्ध अशा गाेष्टी शब्दांच्या माध्यमातून सांगता येतात. प्रपंची माणसे हाच नियम परमार्थात लावून ते शाश्वत समाधान कसे असते हे आम्हाला वर्णन करून सांगा असा आग्रह धरतात. त्याला उत्तर देताना श्रीसमर्थ म्हणतात की, सर्वच गाेष्टी स्पष्ट करण्यास शब्द पुरेसे नसतात.
अगदी साध्या व्यवहारातही गुळाची गाेडी कशी असते हे शब्दांनी सांगता येत नाही, तर त्यासाठी ताे प्रत्यक्ष खाऊनच गुळाची गाेडी जाणून घ्यावी लागते. मग परमबाेधासारखे अत्युच्च समाधान शब्दांच्या आवाक्यात काेठून येणार? ते खराेखरी सांगता न येण्यासारखे असून प्रत्यक्ष अनुभव घेऊनच ते जाणावे लागते आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनानेच त्याची पात्रता येऊ शकते.आत्मसमाधानाचा विषय तसा गहन आहे; ताे साेपा करून सांगण्याचा प्रयत्न श्रीसमर्थांनी केलेला आहे; पण आपण ताे समजावून घेण्यासाठी एकचित्त हाेऊन आणि ध्यानपूर्वक प्रयत्न करावयास हवा! ज्याला आत्मज्ञानाची तळमळ लागेल ताे या ऐहिकातील नाशवंतपणा ओळखून सद्गुरूला शरण जाईल आणि सत्य वस्तूच्या प्राप्तीसाठी त्याचे मार्गदर्शन घेईल.