आसुरी संपत्तीचे वर्णन करताना आपणांस किती अवघड हाेत आहे याचे ज्ञानेश्वर या ओवीत वर्णन करीत आहेत. हे असुर धनाच्या लाेभाने काय करीत नाहीत? यज्ञाचीदेखील नक्कल करतात. ज्याप्रमाणे दुभत्या गाईपुढे ती पान्हवण्यासाठी एक कृत्रिम वासरू उभे करतात, त्याप्रमाणे यज्ञाचे निमित्त करून हे सर्व जगाला लुबाडीत असतात. आपणच दीक्षित आहाेत, असा गर्व करीत असतात. अंधारात जसे काजवे चमकावेत, त्याप्रमाणे यांचा अहंकार व उद्धटपणा वाढताे.इतरांचे नाव वाढू नये म्हणून हे यत्नशील असतात.उन्मत्तपणा, काम, क्राेध यांची वाढ हाेते. ते सतत मग हिंसाच करीत राहतात. ते रक्त-मांसाचा उपयाेग जारणमारणासाठी करतात. हे लाेक पतिव्रता, सत्पुरुष, तपस्वी, संन्यासी यांचा द्वेष करतात. मनुष्यत्वाचा आश्रय घेऊन हे जगाचा नाश करतात.
बिळात अडकून राहिलेले ते सर्पच असतात. या आसुरी संपत्तीच्या लाेकांना अधाेगती मिळते. तामसी याेनीत ते जन्म पावतात. किळस येणाऱ्या नरकात ते लाेळतात.त्यांच्या याेगाने घाणीलासुद्धा मळ लागताे. तापाला पाेळले जाते. मृत्यूला भय वाटते. पापांना यांचा कंटाळा वाटताे.यांच्यापासून अशुभ उत्पन्न हाेते. विटाळालासुद्धा विटाळ हाेताे. अरेरे! या असुरांची आणखी कथा काय सांगावी? वाणी रडकुंडीला येते. यांच्या लीलांची आठवण झाली की मन मागे िफरते. हाय, हाय! या मूर्खांनी केवढी दुर्गती प्राप्त करून घेतली आहे! अर्जुना, तू या लाेकांच्या नादी लागू नकाेस. दंभादि दुर्गुणांचा तू त्याग कर. हे तुला आता वेगळे सांगण्याची जरूरी नाही. कामक्राेधादिकांनी तू वाटाड्या करू नकाेस. यांचा मार्ग म्हणजे नरकाची द्वारे आहेत.