वारकरी संप्रदाय हा मानवता जाेपासणारा व मानवतेची शिकवण देणारा संप्रदाय आहे.संसारात अडकलेल्या जीवाला संसारात राहूनही ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, काम, क्राेध, लाेभ, स्वार्थ आदीतून मुक्त हाेण्याचा मार्ग दाखवणारा हा संप्रदाय आहे.नराला नारायणाची अनुभूती देणारा हा सांप्रदाय व्यक्तिला माणूस बनविण्यासाठी ज्या माध्यमांचा वापर करताे त्या माध्यमात प्रामुख्याने प्रवचन, कीर्तनाचा समावेश हाेताे. संसारात अडकलेल्या जीवाकडे मीपणा किंवा अहंकारामुळे जे दाेष जमा झालेले असतात, ते दाेष प्रवचन, किर्तनाच्या माध्यमातून पळवून लावले जातात.
समचरणी उभा राहून समता, बंधुता, निस्वार्थ प्रेम व कर्तव्याचा संदेश देणाऱ्या पांडुरंगाचे गुणगाण किर्तनातून केले जाते. आई-वडिलांची सेवा करणाऱ्यांना तसेच कर्तव्यात परमेश्वर मानणाऱ्यांना भेटण्याची अपेक्षा करणाऱ्या पांडुरंगाच्या नामाचा जयघाेष कीर्तनातून हाेताे. अर्थात मानवाला त्याचा खरा परिचय करून देण्यासाठी कीर्तनकार कीर्तनातून भूमिका बजावतात. त्यामुळे मीपणा व अहंकारात अडकलेल्या जीवाला त्याच्या स्वची जाणीव हाेऊ लागते. स्वची जाणीव हाेणे ही जीवनातील महत्त्वपूर्ण पायरी असते.
- डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448