हातपाय हलवणाऱ्या म्हणजेच कष्ट करणाऱ्या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना भगवंत चारा देताे. या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, पक्षी अजगर न करी संचित । तयासी अनंत प्रतिपाळी ।। देरे देवा पलंगावरी असे म्हणून चालत नाही. भूक असाे किंवा गरज असाे, त्याच्या पूर्ततेसाठी काही प्रमाणात का हाेईना कष्ट हे करावेच लागतात.दुसऱ्याच्या कष्टावर जगणे म्हणजे मानवतेला काळीमा फासणारे लक्षण हाेय. निसर्गत: परावलंबित्व असेल म्हणजेच माणूस स्वत:च्या पायावर उभा राहण्यास निसर्गत: असमर्थ असेल, तर त्याच्यबाबतीत परावलंबित्व ठिक आहे;
पण हात, पाय, बुद्धी सर्व काही असूनही त्यांची अजिबात हालचाल न करता आळशीपणाने तुकडे ताेडणे म्हणजे मूर्खपणाचे हाेय. आपल्या स्वकष्टातून मिळविलेल्या अन्नाचा किंवा गरजा पूर्तीचा आनंद हा निश्चितच परावलंबित्व सुखापेक्षा जास्त सुखकारक असताे. ज्ञानाेबा-तुकाेबांच्या भक्तांनी परावलंबी हाेऊ नये आणि आपल्या चुकीमुळे काेणाला परावलंबी हाेऊ देऊ नये. कारण ज्ञानाेबा-तुकाेबांचा भगवंत कर्तव्यात आहे, हे लक्षात असू द्यावे. जय जय राम कृष्ण हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448