मुळात अहंकार या शब्दातच किंवा अहंकार हा शब्दच दाेषयुक्त असल्यामुळे देहाला मी म्हणण्याची चूक आपल्याकडून हाेऊ नये. अहंकाराची नष्टता म्हणजे मी ची नष्टता हाेय. अहंकाराच्या नष्टतेमुळे अहंकाररूपी मनाेवृत्ती आपाेआप ओस पडते. अर्थात मनातून अहंकार गेला म्हणजे मनात आपाेआप निःस्वार्थप्रेम, समता, बंधुता नांदू लागतात. प्रसंगानुरूप काहींचे अहंकार जात असतील; पण प्रयत्नाने सर्वांचे अहंकार जाऊ शकतात. आपल्या जीवनात एखादा प्रसंग यावा आणि अहंकार निघून जावा, अशी अपेक्षा करण्यापेक्षा आपण हळूहळू आपल्यातील अहंकाराला काढून टाकण्याचा प्रयत्न करणे जास्त याेग्य असते.
सत्ता, संपत्ती, साैंदर्य आदीच्या बळावर उड्या मारणाऱ्या माणसाने हे लक्षात ठेवावे की, आपला देहच मुळात नश्वर व काळाच्या अधीन असल्याने सत्ता, संपत्ती, साैंदर्य हेही क्षणीक व नाशवंत आहेत. त्यामुळे अशा क्षणिक व नाशवंतांच्या बळावर अहंकाराला जाेपासणे म्हणजे स्वत:ला शाश्वत सुखापासून दूर नेणे हाेय. महाराजांच्या अभंगांचे अर्थ मी माझ्या अल्प बुद्धीने काढीत आहे.त्यामुळे मूळ अर्थाची उणीव महाराजांची गाथा वाचूनच भरून काढावी लागेल. जय जय राम कृष्ण हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448