वाच्यार्थ : दान दिल्याने दारिद्र्य नष्ट हाेते, चांगले चारित्र्य वाईट परिस्थितीचा नाश करते, प्रज्ञा अज्ञानाचा नाश करते आणि भावना भीतीचा नाश करते.
भावार्थ : काेणत्या गाेष्टींमुळे कशा-कशाचा नाश हाेताे, हे चाणक्यांनी इथे सांगितले आहे.
1. दान : आपल्या क्षमतेनुसार दान दिल्याने आपले दारिद्र्य नष्ट हाेते. स्वार्थासाठी धनाचा व्यय केल्यास व्यक्ती विलासी बनते, धनाची उधळ-माधळ, अपव्यय करते.चुकीच्या कामी (विनाकारण) धनाचा व्यय केल्याने धन नष्ट हाेत जाते. कर्ज काढून सण साजरे करण्याची वृत्ती वाढीला लागते. याउलट धन सत्कारणी लावल्याने म्हणजेच सत्पात्री दान दिल्याने समाधान (Joy of Giving! ) मिळते आणि अविरत परिश्रम करून दान देण्यासाठी धन संचित केले जाते व अशा तऱ्हेने दारिद्र्याचा नाश हाेताे. ‘दिल्याने मिळते’ हा सृष्टीचा नियम आहे.