धन, संपत्ती, सत्ता आदीच्या उपलब्धतेला सुख, माेक्ष मानणारा संसारी जीव खऱ्या माेक्षाची परिभाषा समजू शकत नाही. धन, संपत्ती, सत्ता आदीमध्येच खरे सुख, खरा माेक्ष असल्याचे मानणाऱ्या जीवाची मानसिकता सदैव अस्थिर असते. आहे त्या नाशवंत उपलब्धतेमध्ये वरचेवर वाढ करण्यात असा जीव सुख मानताे. नाशवंत किंवा भाैतिक सुखाच्या मागे लागलेला माणूस मानसिकदृष्ट्या स्थिर हाेऊ शकत नाही. त्याची ही अस्थिरता त्याला त्याच्या खऱ्या परिचयापासून दूर नेते. जाे माणूस स्वत:पासून दूर जाताे ताे माेक्षाच्या जवळ जाण्याचा किंवा इतर जीवमात्राला आपले म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
ज्याला सर्व जीवमात्र एका ईश्वराचे अंश वाटतात, त्याला समता, बंधुता, निःस्वार्थ प्रेम, कर्तव्याची वेगळ्या प्रकारे आठवण द्यावी लागत नाही. अशा जीवाला माेक्ष प्राप्तीसाठी वेगळे कांही करावे लागत नाही. अशांना माेक्षाशी कांही देणे घेणे नसते. संसारात अडकलेला व नाशवंत देहाला मी समजणारा जीव मात्र प्रत्येक गाेष्टीत, घटनेत देवाण-घेवाण करताे. त्याची ही देवाण-घेवाण मरेपर्यंत संपत नाही. अशांना माेक्ष तर साेडाच; पण खरे सुखही मिळत नाही.
जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448