तरी घरीं मातापितरां। धड बाेली नाहीं संसारा। येर विश्व भरी आदरा। मूर्खु जैसा।। (18.595)

    22-Apr-2023
Total Views |
 
 

Dyaneshwari 
 
या ओवीत ज्ञानेश्वर महाराज राजस कर्माचे वर्णन करीत आहेत.कर्माच्या फलाची इच्छा धरून अहंकारयुक्त अंत:करणाने आणि माेठ्या प्रयासाने जे कर्म करण्यात येते त्याला राजस कर्म म्हणतात. हा विचार स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वर नेहमीप्रमाणे दृष्टांत देत आहेत. एखादा मूर्ख मनुष्य आईबापांशी घरी नीट बाेलत नाही, पण जगातील सर्व व्यक्तींशी मात्र ताे प्रेमाने वागताे. अथवा तुळशीच्या झाडाला पाण्याचा थेंबही देत नाही आणि द्राक्षाच्या बुडाला मात्र दुधाचे पूर वाहवत असताे. त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मे करण्याकरता ताे बसलेला उठतदेखील नाही. पण काम्य कर्मांसाठी मात्र धन, देह खर्च केला तरी त्याला काही वाटत नाही. त्याला खूप प्राप्ती झाली की त्याला द्रव्य देताना तृप्ती हाेत नाही. हाती परीस आला की, संपत्ती खर्च करण्यासाठी लाेखंड विकत घेण्याचा उत्साह वाढताे. त्याप्रमाणे कर्माच्या फळाकडे लक्ष ठेवून कठीण अशी काम्यकर्मे मनुष्य करीत असताे.
 
काम्यकर्म नेहमी लाेकांत दवंडी देऊन ताे प्रसिद्ध करताे.मी अमुक कर्म केले, असा सारखा उच्चार करताे. मग ‘मी कर्म केले’ असा त्याला अभिमान हाेताे. बाप व गुरू ह्यांना ताे मानीत नाही. काळज्वर औषधाला काेठे दाद देताे? तसा अहंकारी मनुष्य अहंकाराच्या भरात फळाची इच्छा धरून आदराने बाेलताे. पण हेसुद्धा त्याला ार कष्टाचे हाेते. काेल्हाट्यांचा पाेट भरण्याचा धंदा जसा असताे, तसा हा त्याचा उद्याेग असताे. धान्याच्या एका दाण्यासाठी उंदीर सर्व डाेंगर पाेखरताे. शेवाळासाठी बेडूक सर्व समुद्र ढवळताे. भिक्षा मिळावी म्हणून गारुडी साप बाळगताे.परमाणूच्या लाभासाठी वाळवी पाताळापर्यंत जाते.त्याप्रमाणे स्वर्गसुखाच्या लाभासाठी एकसारखे जे काम्यकर्म केले जाते ते राजस हाेय.