गीतेच्या गाभाऱ्यात

    22-Apr-2023
Total Views |
 
 
पत्र तेरावे
 
Bhagvatgita
‘‘कृपा करून आणखी एकदा चहा द्या.’’ मी म्हटले.‘‘चहा देताे. पण महाराज आपण आता चाैथ्यांदा चहा घेणार आहात असे कसे?’’ संन्यासी म्हणाले, ‘‘खरं सांगू? मला चहाची तल्लफ वरचेवर येते. माझं मन माझ्या ताब्यात राहात नाही.’’ हा प्रकार पाहून मी चाट झालाे. खूप विद्वान असलेला हा मनुष्य, प्रत्यक्ष आई वारल्यावर काही दु:ख झाले नाही, असे म्हणणारा हा संन्यासी, मन ताब्यात ठेवण्याच्या बाबतीत फार वरच्या पायरीवर गेलेला हा महाभाग चहाच्या बाबतीत म्हणताे की माझे मन माझ्या ताब्यात राहात नाही! ही गाेष्ट ऐकून तुला कळून येईल की, अतिरेकी लाेकांचा असा चमत्कारिक प्रकार हाेताे. अहंकार जसा वाईट तसा अतिरेकदेखील वाईट. अतिरेकाबराेबर अहंकारदेखील येताे.अहंकार अतिरेकाची सावली आहे. सुवर्णमध्य गुणांची माऊली आहे.
 
तू विचारतेस - ‘‘तुम्ही मला एका पत्रात निरनिराळ्या धर्मांची माहिती दिली हाेती. या जगात भविष्यकाळात काेणता धर्म प्रस्थापित हाेईल? त्या वेळी गीतेची किंमत राहील का? तुम्हाला श्रीकृष्णाबद्दल फार प्रेम आहे. पाश्चात्यांपैकी कुणाला श्रीकृष्णाबद्दल मनापासून प्रेम वाटते का?’’ हे पहा, तू जग असा शब्द वापरला आहेस. तुला कल्पना करता येणार नाही, इतके जग अफाट आहे. सूर्यापासून आपली पृथ्वी जन्माला येऊन काेट्यवधी वर्षे झाली. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर किती मैल आहे, याचा विचार करताना काही काेटींचा उपयाेग करावा लागताे. ग्रहांचे अंतर माेजताना मैल अपुरे पडतात. मैलांच्या भाषेत बाेलता येत नाही. एका सेकंदाला प्रकाश काही मैल प्रवास करताे.अशा वेगाने ताे एका वर्षांत किती प्रवास करताे याचे गणित केले जाते व त्याला प्रकाशवर्ष असे म्हटले जाते.
 
पृथ्वीपासून ताऱ्यांचे अंतर माेजताना प्रकाशवर्षाचा उपयाेग केला जाताे. असल्या अफाट जगाचे मानवाला अद्याप पूर्ण ज्ञान झालेले नाही.तू असे लक्षात घे की, जगाच्या मानाने पृथ्वी एक बिंदू आहे. त्या पृथ्वीवर बरेच धर्म आहेत. असे दिसते की, भविष्यकाळात मानवता धर्म प्रस्थापित हाेणार आहे. त्या धर्मात गीतेला माेठा मान मिळेल, कारण गीतेमध्ये मानवताधर्मांचे सुरेल संगीत आहे.तुझ्या पुढच्या प्रश्नाचे उत्तर असे कीपाश्चात्त्यांपैकी कितीतरी लाेकांना श्रीकृष्णाबद्दल प्रेम वाटते. एक इंग्रज वैमानिक हाेता. त्याचे नाव राेनाॅल्ड न्निसन.केंब्रिज विद्यापीठाचा ताे पदवीधर हाेता. ताे भारतात आला.प्राध्यापक म्हणून काम करू लागला.त्याने The Yoga of Bhagwad Gita हा माैलिक ग्रंथ लिहिला. त्याचे श्रीकृष्णावर इतके प्रेम हाेते की, त्याने श्रीकृष्ण प्रेम हेच नाव धारण केले व त्याच नावाने ताे प्रसिद्ध झाला.