पत्र तेरावे
अशा तऱ्हेने अंगठीवरील शब्द नेहमी वाचल्यामुळे मनाचा समताेलपणा राहण्यास त्याला मदत हाेत असे.तू आपल्या पत्रात लिहितेस - ‘‘धर्म या शब्दाबद्दल माझा पुष्कळदा घाेटाळा हाेताे, याबद्दल कृष्णाला काय म्हणावयाचे आहे? पुरुषार्थ चार आहेत. धर्म, अर्थ, काम व माेक्ष. या ठिकाणी धर्म याचा अर्थ काय आहे? केव्हा-केव्हा माेक्षधर्म असेही म्हणतात. धर्म, अर्थ, काम व माेक्ष या पुरुषार्थात पहिला शब्द जाे धर्म आहे त्यात माेक्षाचा अंतर्भाव हाेताे का? अर्थ व काम हे जर पुरुषार्थ आहेत, तर या विषयी परमार्थ मार्गात इतकी उदासीनता का? अर्थ व काम हे पुरुषार्थ असताना मनुष्याने अर्थाच्या मागे लागू नये, मनुष्याने कामाच्या मागे लागू नये, अशी परमार्थ मार्गात शिकवण का दिली जाते?’’ तू हल्ली खूप विचार करू लागली आहेस. तुझे प्रश्न मार्मिक आहेत. धर्म या शब्दाचे दाेन अर्थ आहेत.
(1) पारलाैकिक सुखाचा मार्ग (2) व्यावहारिक सुखाचा मार्ग यावरून तुला कळून येईल की, जेव्हा पारलाैकिक सुखाचा मार्ग याबद्दल विचार चालू असताे तेव्हा आपण पारलाैकिक धर्म म्हणताे. याच धर्माला माेक्षधर्म म्हणताे. याच धर्माला माेक्षधर्म अथवा नुसते माेक्ष असे म्हटले जाते. व्यावहारिक सुखाच्या मार्गाला व्यावहारिक धर्म अथवा नुसते धर्म असे म्हटले जाते. यालाच नीतिधर्म असे म्हणतात. धर्म, अर्थ, काम व माेक्ष या चार पुरुषार्थात पहिला पुरुषार्थ जाे धर्म आहे ताे व्यावहारिक धर्म किंवा नीतिधर्म. चाैथा पुरुषार्थ जाे आहे ताे माेक्षधर्म.महाभारतात कृष्णाने धर्माची व्याख्या करताना म्हटले आहे, धारणाद्धर्ममित्याहुर्धर्माे धारयते प्रजा:। य: स्याद्धारणसंयु्नत: स धर्म इति निश्चय:।। धर्म हा शब्द धृ=धारण करणे या धातूपासून निघाला आहे. धर्मात सर्व प्रजा बद्ध झाली आहे. ज्याने प्रजेचे धारण हाेते ताे धर्म हा निश्चय हाेय.या ठिकाणी व्यावहारिक धर्म अथवा नीतिधर्म अभिप्रेत आहे.
महाभारतात शेवटी व्यासांचा आक्राेश आहे. व्यास म्हणतात.उर्ध्वबाहुर्विराैम्येष न च कश्चिच्छुणाेति माम्। धर्मादर्थश्च कामश्च स धर्म: किं न सेव्यते।। हात उंच करून मी ओरडत आहे. पण काेणी माझे ऐकत नाही. धर्मात अर्थ व काम प्राप्त हाेतात. असला धर्म तुम्ही का आचरत नाही? महाभारतात व्यासांनी खरा परमार्थ शिकवला आहे. त्यांना म्हणावयाचे आहे की - तुम्ही वाटेल तितका पैसा मिळवा, पण ताे नीतिधर्माच्या आधारे मिळवा. वाटेल तित्नया कामाचा उपभाेग घ्या, पण ते सारे नीतिधर्मात हाेऊ द्या.अर्थ जेव्हा नीतिबाह्य असेल, अथवा काम जेव्हा नीतिबाह्य असेल तेव्हा ते परमार्थाला मंजूर नाही.परमार्थात जेव्हा अर्थाच्या विरुद्ध अथवा कामाच्या विरुद्ध बाेलले जाते तेव्हा जाे नीतिबाह्य अर्थ आहे किंवा जे नीतिबाह्य काम आहे त्याविरुद्ध बाेलले जाते.