जाे जाणेल भगवंत । तया नांव बाेलिजे संत ।।1।।

    15-Apr-2023
Total Views |
 
 

saint 
काेणतीही वस्तू असाे अगर ज्ञान असाे, ती मिळविण्याची इच्छा निर्माण झाली तरच माणूस ती मिळवण्याच्या प्रयत्नाला लागताे. देवाची ओळख करून घेण्याची गरज सांगितल्यानंतर ज्याला ती भासू लागेल त्याने काेणत्या मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत, हे श्रीसमर्थ आता सांगत आहेत. देव ओळखण्यासाठी साधकाचे व्यक्तिगत प्रयत्न अनेकदा पुरे पडत नाहीत. येथे श्रीसमर्थ नवविधा भक्तीपैकी श्रवण-मनन इत्यादी मार्गांचा निर्देश करतात आणि म्हणतात की, या मार्गाने ज्याला साधेल ताे पुण्यवान म्हणावा लागेल; परंतु सामान्य माणसाला परमेश्वरप्राप्तीची तीव्र जिज्ञासा हाेऊनही या मार्गाने ते स्वबळावर साध्य हाेऊ शकत नाही. अशांनी मग संतांना शरण जाऊन त्यांची संगत धरावी. उपदेश घ्यावा, म्हणजे ते साधू शकेल.
 
अशा वेळी मग हे संत कसे ओळखावेत, असा प्रश्न सहजच श्राेत्यांच्या मनात येईल, हे जाणून त्याचेही उत्तर पुढील ओव्यांतून दिलेले आहे.जाे शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे ओळखल्यामुळे परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करताे ताेच संत हाेताे. सर्व विश्वामध्ये परमतत्त्व हे एकमेव सत्य आहे आणि ते कधीही चळत किंवा ढळत नाही, अशी त्याची मनाेमन खात्री पटलेली असते.त्यामुळे ताे स्वत: असामान्य स्थितीला पाेहाेचताे; पण, तरीही राेजच्या जीवनात मात्र त्याचा बडिवार न माजवता, साेंगे-ढाेंगे न करता तुमच्या आमच्यासारखं सामान्यपणे जगताे; परंतु अंतर्यामी मुक्त झाल्यामुळे असामान्य अशा जगावेगळ्या सत्य ज्ञानाचा उपदेश करीत असताे. त्याच्या मनात सदैव परमेश्वराची जागृती असते. निर्गुण, निराकार परमात्म्याला जाणणे म्हणजेच सत्य ज्ञान हाेय.