बहिरे मुके एके ठायीं । तैसें झालें तया दाेहीं ।।1।।

    14-Apr-2023
Total Views |
 
 
 
 
saint
इतरांना देण्यासाठी देणाऱ्याकडे काही तरी असावे लागते. तसेच इतरांकडून घेण्यासाठी घेणाऱ्याला खराेखर गरज असली पाहिजे.
त्याचबराेबर सकारात्मक दृष्टिकाेनातून स्वीकारण्याची वृत्ती असली पाहिजे. तरच देवाण-घेवाणीला अर्थ असताे. जर देणारा देण्यास पात्र नसेल व घेणाऱ्यास घेता येत नसेल, तर देवाण-घेवाणीला अर्थ राहत नाही. आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक यापैकी काेणतेही क्षेत्र असाे, केवळ स्वत:ला लाभ मिळावा, स्वत:चे माेठेपण हाेऊन उदाे-उदाे व्हावा, या दृष्टिकाेनातून सर्वसामान्यांना कांही देण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर देवाण-घेवाणीला अजिबात अर्थ नाही.
 
मानसिक ताणतणाव कमी व्हावा किंवा स्वत:चा परिचय व्हावा म्हणून आध्यात्मिक क्षेत्रात देवाणघेवाण हाेत असते. पण, देणारा लाेभापाेटी देत असेल व स्वीकारणारा आंधळेपणाने स्वीकारत असेल, तर बहिऱ्या मुक्याची गाठ पडल्यासारखे हाेईल. अर्थात काेणाच्याही पदरात काही पडणार नाही. या आनुषंगाने स्पष्ट करताना तुकाराम महाराज म्हणतात, बहिरे मुके एके ठायीं । तैसे झाले तया दाेहीं ।। अशा बहिऱ्या मुक्यात आपला समावेश हाेणार नाही, याची काळजी आपण घेऊ या. मी माझ्या अल्प बुद्धीला समजेल असे अभंगाचे अर्थ काढले आहेत. त्यामुळे यात काही चुकीचे वाटले, तर ती चूक आपण पदरात घ्यावी.
जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448