साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची? जप, तप, नेम, याग, वगैरे आपण कशाकरिता करताे? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून.
ताेच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटाआटी कशाला करायची ? गुरुभक्ती करायची म्हणजे काय ? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरूची सेवा असे तुम्हाला वाटते का ? वास्तविक, देहाची सेवा करणे ही गुरूची खरी सेवाच हाेत नसते. गुरू सांगेल तसे वागणे हीच त्याची खरी सेवा हाेय.माझ्याजवळ जे जे येतात, ते कुणी मुलगा मागताे, कुणी संपत्ती मागताे, कुणी राेग बरा करा म्हणून मागताे; तेव्हा, माझी सेवा करायला तुम्ही येता, का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता?
समजा, तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात आणि त्याच्या घरी काेणी मनुष्य मेला आहे आणि ताे सुतकात आहे; अशाजवळ जर तुम्ही पंचपक्वान्नाचे जेवण मागितलेत तर त्याला काय बरे वाटेल ? माझ्याजवळ येऊन संसारांतले सुख मागणे हे तशासारखेच हाेय.माझ्याजवळ येऊन मनुष्यदेहाचे खरे सार्थक हाेईल असे करा. तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थाेडेसे देणार नाही असे नाही, पण ते काढा घेण्याकरिता गुळाचा खडा देण्यासारखे आहे. गुरूला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की त्याचे मन आणि आपले मन एक झाले पाहिजे. त्याचे जे जे व्यापार हाेतील ताे मीच आहे, त्या व्यतिरिक्त मी नाही, अशी पक्की भावना झाली पाहिजे. म्हणून साधनाची आटाआटी करण्याचे कारण नाही; नाही तर त्याचाच अभिमान हाेताे, आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलट ताेटा हाेताे. जे जे घडत असते ते माझ्याच इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना.
तुम्ही जी जी गाेष्ट कराल त्यात मला आठवा. म्हणजे यापेक्षा दुसरे साधन नाही. आपण आपल्या आईशी जसे बाेलताे तसे माझ्यापाशी बाेलावे, आपले सर्व दु:ख मला सांगत जावे. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हांला रिकामे परत जाताना पाहून मला वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हांला मिळायचे नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम हाेय. नाम घ्यावे असे वाटते म्हणजे आपल्यावर भगवंताची कृपा आहेच; आपली रेषा उत्तम पडली आहे.मुंगी डाेंगरावर चढण्याचा प्रयत्न करते, आणि कालांतराने का हाेईना पण वर पाेहाेचल्याशिवाय राहात नाही हे ध्यानात धरून आपण प्रयत्नाला लागू या. राम खात्रीने कृपा करील हा विश्वास बाळगा.