दासबाेधाच्या सहाव्या दशकाचे नावच मुळी ‘देवशाेधन’ हे आहे. यातील दहा समासांत श्रीसमर्थांनी ब्रह्म आणि माया, दृश्यविश्व आणि त्यामागील दृश्यातील परमतत्त्व यांचे विवेचन करून दृश्याचे निरसन करून सारशाेधन कसे करावे याचे विवेचन केलेले आहे.त्यातील पहिलाच ‘देवशाेधन’ हा आहे.त्यांच्या दृष्टीसमाेर सामान्यातला सामान्य माणूस प्रपंच उत्तम व सन्मार्गाने करून शेवटी परमार्थबाेध कसा जाणू शकेल ही दासबाेधामागील प्रेरणा हाेती. त्यामुळे त्याला सहजी समजत जाईल अशा उदाहरणांनी आणि दैनंदिन जीवनातील दाखले देत साेप्या भाषेत गहन तत्त्वज्ञानसुद्धा सांगितले आहे. देवशाेधन म्हणजे परमेश्वराचा शाेध घेण्याची इच्छा आणि नंतर त्यासाठी प्रयत्न करण्याला प्रपंची माणूस कसा उद्युक्त हाेईल याचे मार्गदर्शन आहे.
श्रीसमर्थ म्हणतात की, आपल्याला ज्या गावात राहावयाचे आहे तेथील प्रभूला म्हणजे प्रमुखाला भेटून त्याच्याशी सलाेख्याचे संबंध ठेवावे लागतात. त्यामुळे इतर लाेक आपल्याला त्रास देत नाहीत आणि आपले जीवन सुखाचे हाेते. त्याची भेट घेतली नाही, सुसंबंध प्रस्थापित केले नाहीत, तर मग आपल्याला काेणी विचारत नाही. उलट लाेक त्रास देतात आणि सुरळीतपणे जगता येत नाही.अगदी िफरस्ती माणसेसुद्धा आजही हे पथ्य पाळताना दिसतात. माण देशातील धनगर मंडळी मेंढरे घेऊन गावाेगाव जातात तेव्हा त्या गावच्या पाटलाची गाठ घेतात. त्यामुळे गावातील टगे लाेक त्यांना त्रास देत नाहीत.