आपल्या नेहमीच्या प्रथेस अनुसरून ज्ञानेश्वर महाराज या चाैदाव्या अध्यायाच्या प्रारंभी सद्गुरूंचा जयजयकार करीत आहेत. ते म्हणतात की, चंद्र व सूर्य यांच्यातील तेज, गुरुनाथा, तुमच्यामुळे आहे. वायू तुम च्यामुळे हालचाल करताे. तुमच्या स्वरूपाचे वर्णन करणे झाल्यास वेदालाही मूक व्हावे लागते. वैखरी वाचाही अडखळते. म्हणून तुझी स्तुती करण्याऐवजी मुकाट्याने तुझ्या पायांवर मस्तक ठेवावे. गुरुराजा, आपण जसे आहात, तशाच रूपाला मी नमस्कार करताे. माझा हा ग्रंथरूपी उद्याेग पूर्ण हाेण्यास आपले कृपारूपी भांडवल मुक्त करावे.माझ्या बुद्धीची पिशवी आपण भरावी. ज्ञानयुक्त अशा काव्याचा लाभ मला व्हावा.
मग मी चांगली सुंदर कर्णभूषणे संतांना घालीन. गुरुनाथा, या गीतेतील बाेध व्यक्त हाेण्यासाठी आपल्या कृपेचे अंजन माझ्या डाेळ्यांत घाला गुरुसूर्या, आपण आपल्या करुणारूप शुद्धबिंबाने उदयास यावे. गुरुश्रेष्ठा, माझ्या बुद्धिरूपी सुंदर वेलाला काव्यरूप फळ यावे. यासाठी वसंतरूपाने आपण प्रकट व्हावे. ज्यामुळे बुद्धिरूप गंगा सर्वत्र पसरेल असा उदार दृष्टीचा वर्षाव आपण करावा. गुरुराया, आपणच सर्व जगाला एक आश्रय आहात. आपला प्रसादरूप चंद्र माझ्या अंत:करणात नित्य उदयास येऊन स्ूर्तीची पाैर्णिमा कराे. महाराज, कृपादृष्टीने आपण माझ्याकडे पहावे. तरच माझ्या बुद्धिरूपी समुद्रातील स्ूर्तीला शांत इत्यादी नवरसांची भरती येईल. ज्ञानेश्वरांची ही नम्र भाषा ऐकून निवृत्तिनाथ संतुष्ट झाले. ते ज्ञानेश्वरांना म्हणाले, आता ही स्तुती पुरे. श्राेत्यांची ऐकण्याची इच्छा तृप्त कर. निवृत्तिनाथांनी ग्रंथनिरूपण कर, असे सांगण्याची वाटच ज्ञानेश्वर पहात हाेते.