ऐसा करावा काही नेम । जेणे जाेडेल आत्माराम ।।

    12-Apr-2023
Total Views |
 
 

Gondavlekar 
 
 
नेम असावा शाश्वताचा। जेणे राम कृपा करील साचा।। नेम असावा वाचा मन। जेणे संतुष्ट हाेईल रघुनंदन।। कर्तव्यात गुंतवावे शरीर। जेणे संताेषे रघुवीर।। सतीला नसे दुजे दैवत जाण। तिला पति एकच प्रमाण।। न पाहावे त्याचे दाेष गुण। आपले कर्तव्य करावे जतन।। पतिव्रताधर्म श्रेष्ठ भारी। वंदिताती संत महामुनी।। पतिआज्ञा प्रमाण। हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण ।। न बाेलावे उणेपुरे। जे परमात्म्यास न आवडेल खरे।। संतति व संपत्ती। भगवत्कृपेने ज्याची प्राप्ती। त्याचे करावे रक्षण। पण न गुंतू द्यावे मन।। जे आवडेल पतीला पाही। ताे ताे आपला धर्मच राही।। मनाने करावे भगवंताचे स्मरण। जेणे चुकेल जन्मम रण।। अखंडराखावे समाधान। चुकाेन द्यावे अनुसंधान।। काया गुंतवावी प्रपंचात। मन असावे रघुनाथात।। प्रपंचात राखावी खबरदारी । मन लावावे रामावरी।। त्याचा राम हाेईल दाता।। न करावी कशाची चिंता ।। मुखी असावे नामस्मरण। हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव। शुद्ध राखावे आचारण। पवित्रतम अंत:करण। मुखाने भगवंताचे स्मरण। त्यावर कृपा करील रघुनंदन।
 
हा ठेवावा विश्वास। अनुभव येईल नक्की खास ।। पतीस करावे एकदा तरी नमन। रामरूप जाणून ।। त्याचे जाणावे मनाेगत। तैसे वर्तणे हे आपले हित ।। ऐसा नेम ज्याचे घरी। राम उभा त्याचे दारी।। आल्या अतिथा अन्न द्यावे। काेणास विन्मुख न पाठवावे।। राम कर्ता हा ठेवावा भाव। कमीपणाला नाही ठाव।। सर्वांचे उगमस्थान एक। हे धरावे चित्ती। त्याला नाही कशाची भीती। रामाविण न पाहावे जग। समाधानाची खूण हीच सत्य।। जे जे काही यावे। ते ते रामापासून आले। हा ठेवावा भाव।। साक्षित्वाने देहाचा प्रपंच पाहावा। अंतरी रघुनाथ भजावा।। देहाची गति प्रारब्धाचे हाती। ऐसे शास्त्रे सांगती। परी न येई हें चितीं। एकच जगती माझा रघुपति।। मुखानें घ्यावें रामनाम। हृदयीं परमात्म्याचें प्रेम। याहून दुजा न करावा विचार। हा ठेवावा निर्धार।। चातुर्मासांत करावी सुरुवात। अखंड चालवावा हा हेत।। थाेडा नेम सांगताे कांहीं। ताे करूनिया पाही।। घ्यावें भगवंताचें नाम। खात, पीत, करीत असता काम,। हाेईल तेवढे करावें जतन। परमात्मा पुरें करील हे जाणावें।। सर्वांस सांगावे आशीर्वाद।