विश्वरूपाच्या महामारीच्या दर्शनाने अर्जुन इतका व्याकूळ झाला हाेता की, ताे भीतीने कंपित झाला. तरी त्याच्या अंत:करणात भगवंतांविषयी अथांग प्रेम हाेते.ताे त्यांना म्हणाला, देवा, तुमचे हे रूप पाहून माझ्या डाेळ्यांचे भाग्य उदयास आले. तुमचे हे रूप पाहून देवांनाही धसका बसताे. आपले रूप विचित्र व भयानक अशा मुखांनी, नेत्रांनी आणि शस्त्रांनी संपन्न आहे.त्याला अगणित हात, अगणित पाय, अनेक पाेटे आहेत. तुमचे हे रूप म्हणजे प्रलयाग्नीच्या ज्वालाच हाेत. सर्वत्र जिकडेतिकडे तुमचीताेंडे पसरली आहेत.आणि दरीत जसे सिंह दिसावेत, तसे तुमचे दात मुखांत दिसतात. काळ्या रात्री जणू पिशाच्यांचा संचार सुरू आहे.
नाश पावणाऱ्या प्राण्यांच्या रक्ताचा सडा तुमच्या दाढांवर पडला आहे. तुमचे हे रूप म्हणजे काळाने जणू युद्धासच आमंत्रण दिले आहे. सर्वांचे मरण ओढवले आहे.दु:खरूप कालिंदीच्या किनाऱ्यावर तुमच्या या रूपाने झाड उभे आहे. तुमच्या या मृत्युरूप समुद्रात जीवनाची नाैका संतप्त लाटेवर झाेके खात आहे. श्रीकृष्णा, तू जरी आता रागावून बाेललास तरी माझ्या मनात आता या रूपाची भीती निर्माण झाली आहे.म्हणून जगाच्या दु:खाच्या पडद्याआड मी उभा आहे. ज्या मला प्रलयकालाचा अग्नी किंवा रुद्र भीत असताे, माझ्या भयाने मृत्यूदेखील लपून बसताे, ताे मी आज भयाने कंपित झालाे आहे. देवा, आणि हे सर्व तुमच्या विश्वरूपाने केले आहे. परंतु या विश्वरूपाचे नवल असे की, याचे रूप महामारीप्रमाणे आहे. बापा, ही महामारी आपल्या विक्राळ रूपाने प्रत्यक्ष भयासही कंप निर्माण करते.