पण त्यांचा मूळ ओढा विषयाकडेच असल्याने स्मशानवैराग्यासारखी त्यांची ही सुधारणाही क्षणभंगुरच ठरते आणि ते पुन्हा मूळ पदावर जातातच.असे हे नालायक शिष्य अधमाहूनही अधम, कृतघ्न, पापी, अविवेकी, विषयासक्त, देहाभिमानामुळे आणि अल्प ज्ञानामुळे उर्मट झालेले दुराचरणी असतात.भक्ती, ज्ञान आणि वैराग्याच्या नुसत्या गप्पा मारणारे हे कुलक्षणी लाेकांशी नीट वागत नसल्याने सज्जनांना अजिबात आवडत नाहीत. अशांचे बाेलणे एक व करणे दुसरेच असते.
दु:खितांनाच दु:ख देणे, पीडितांना पीडाच देणे यातच आनंद मानणाऱ्या अशा नालायक शिष्यांचा श्रीसमर्थांना विलक्षण तिरस्कार आहे.स्वत:च्याच खाेट्या मस्तीत उन्मत्त झालेल्या या कुशिष्यांना ‘बापुडे’ म्हणून श्रीसमर्थ म्हणतात की, त्यांना पूर्वपातकांमुळे सद्बुद्धी प्राप्त हाेत नाही व त्यामुळे अशांना भगवंत कधीतरी भेटेल का? कुकर्मी शिष्यांची अशी झाेडपण करण्यामागे साधकांनी शिष्यत्व पत्करताना चुकून या वाममार्गाला आपण जाणार नाही ना ही काटाकाळजी घ्यावी व सद्गुणी व सच्छिष्य बनण्याचाच प्रखर प्रयत्न करावा असाच श्रीसमर्थांचा हेतू आहे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299