परमात्म्याच्या विस्तृत रूपाने आश्चर्यचकित झालेला अर्जुन भगवंतांच्या रूपाचे विविध अंगांनी वर्णन करीत आहे. ताे असे म्हणत आहे की, देवा, तुम्हास पाहिल्याबराेबर मिठी मारता येईल का? आणि अशी मिठी न मारावी, तर आम्ही संकटात पडावे काय? अशा प्रकारचे संकट माझ्यापुढे उभे राहिले आहे. खरे म्हणजे सर्व त्रैलाेक्यच हाेरपळून निघाले आहे.तुझे विश्वरूप पाहून सर्व जग तळमळत आहे असे मला वाटते; पण खरे पाहता जे ज्ञानसंपन्न आहेत, तेच तुझ्या तेजाची बीजे आहेत. आपल्या सद्भावनेवर ते तुझ्या स्वरूपात येऊन मिळतात आणि जे भयभीत झाले आहेत. ते तुला हात जाेडून फक्त प्रार्थना करतात. ते म्हणतात की, देवा आम्ही अज्ञानसमुद्रात पडलाे आहाेत.
विषयांच्या जाळ्यात अडकलाे आहाेत. स्वर्ग व संसार यांच्या कचाट्यात सापडलाे आहाेत. यांची मुक्तता देवा, काेण करणार? आम्ही तुला सर्व भावांनी शरण आलाे आहाेत.तुझा जयजयकार असाे. अकारा रूद्र, बारा आदित्य, आठ बसू, साध्य, दाेन अश्विनीकुमार, विश्वेदेव, वायू, पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस, देव, सिद्ध इत्यादी सर्व आपल्या शाेधात असतात; पण हे सर्व चकित झाल्याने तुझ्या मुकुटामुळे ओळखतात आणि तुला ओवाळतात. जय जय असा गजर करतात. दाेन्ही हात जाेडून नमस्कार करतात. देवा, या नम्रतारूपी वृक्षांच्या अरण्यात अष्टसात्त्विक भावांचा वसंतॠतू ुलला आहे, म्हणून त्यांच्या करसंपुटरूपी पालवीला तू फळ म्हणून प्राप्त झाला आहेस. देवा, तुला नमस्कार असाे.