सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण । अनन्यभावे शरण । ताेचि सच्छिष्य जाण ।।2।।

    04-Mar-2023
Total Views |
 
 

saint 
 
याशिवाय ताे काया-वाचा-मनाने शुद्ध, प्रज्ञावंत, युक्तिवंत, बुद्धिवंत, प्रेमळ, कुळशीलवान, व्रतनिष्ठ, धारिष्ट्यवान, सात्त्विक वृत्तीचा आणि ग्रंथांच्या गाभ्यापर्यंत जाणारा सुजाण वाचक आणि एकाग्र श्राेता हवा. त्याचा ऐहिकाचा लाेभ संपलेला असावा आणि अंतरामध्ये परमार्थाची ओढ असावी. ताे स्वतंत्र बुद्धीचा, सत्पात्र आणि आपल्या स्नेहशील वागण्याने जगमित्र झालेला असा असावा. प्रत्यक्ष देवापेक्षाही आपला सद्गुरू माेठा आहे अशी त्याची श्रद्धा हवी. याचबराेबर ताे अविवेकी व गर्भश्रीमंत नसावा. कारण विवेकाशिवाय वैराग्य येत नाही आणि श्रीमंती लाडात वाढलेल्याला माेह सुटत नाही. अशा रीतीने सच्छिष्याचे जणू सजीव चित्रच आपल्या डाेळ्यांसमाेर श्रीसमर्थ उभे करतात आणि हे सर्व गुण ज्याच्या अंगी असतील ताेच सच्छिष्य हाेऊन मुक्त दशेला प्राप्त हाेऊ शकताे, असे सांगतात.
 
परमार्थाचे प्रेम लागण्यासाठी संसारातील दु:खाने दु:खी झालेला, विविध तापांनी पाेळलेला असासाधकच जास्त लायक ठरताे. कारण त्या त्रासामुळेच त्यातून सुटण्याचा मार्ग ताे निकराने व निश्चयाने शाेधू लागताे आणि सद्गुरूवर विश्वास ठेवून शरण येताे. अशा शरण आलेल्या शिष्याला सद्गुरू कधीही अंतर देत नाही. त्याच्या अंगातील अवगुण घालवून, त्यांची जागा सद्गुणांनी घ्यावी म्हणून गुरू सतत मार्गदर्शन करताे.या सद्गुरुकृपेने शिष्याचे जीवन भक्ती व वैराग्याने उजळून निघते. जीवनातील लाेभ, माेह, इच्छा संपून जाऊन एकच एक परमात्मा भेटीची त्याला आस लागते. ही तळमळ सद्गुरूवचनानेच शेवटी शांत हाेते आणि ताे सच्छिष्य सायुज्य मुक्तीला पूर्णपणे पात्र हाेताे. त्यापासून संसारातील काेणताही लाेभ त्याला मागे खेचू शकत नाही आणि ताे आत्मज्ञान प्राप्त करून स्वत:च परमेश्वरस्वरूप बनून जाताे असा विश्वास श्रीसमर्थ देतात.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299