भगवंताच्या कृपेने थाेडी द्वैतावस्था प्राप्त झाली. तेव्हा आनंदचकित हाेऊन अर्जुनाने देवास नमस्कार केला दाेन्ही हात जाेडून ताे म्हणाला, देवा तुमचा जयजयकार असाे. तुमच्या कृपेम ुळे मला हे विश्वरूप पाहावयास मिळाले. तुम्ही सर्व विश्वाचे आधार आहात, हे समजून समाधान वाटले. देवा, मंदार पर्वतावर ज्याप्रमाणे हिंस्र पशूंची अरण्ये असतात, त्याप्रमाणे मी तुमच्या शरीरावर अनंत लाेक पाहात आहे.आकाशात ग्रहसमुदाय दिसावेत, माेठ्या वृक्षावर पक्ष्यांची घरटी असावीत, त्याप्रमाणे सर्व देवसमुदाय तुमच्या विश्वरूपाच्या ठिकाणी मला दिसत आहे.महाराज, मी आपल्यामध्ये सर्व प्राण्यांचा समुदाय पाहात आहे. सत्यलाेक, ब्रह्मलाेक, कैलास हे सर्व तुमच्यांत दिसत आहेत.
पार्वतीसह शंकर येथे आहेतच. पण देवा, कृष्णा, तुम्हीही तुमच्या या विश्वरूपात मला दिसता.कश्यपादि ॠषी, सात पाताळे इत्यादी सर्व विश्व तुमच्या रूपात दिसते. त्रैलाेक्याचा राजा श्रीकृष्णा, तुमच्या अंगावर चाैदा भुवनांच्या आकृती दिसतात.तुमची गंभीरता आणिकच जाणवते. देवा, तुमचेच हात फक्त या जगाचा व्यवहार करीत आहेत.तुमच्या विस्तारामुळे ब्रह्मांडांची भांडारे उघडली आहेत. ती तुझ्या पाेटात ंदिसतात. आपल्या हजाराे मुखांचा अनुभव मला येत आहे. सर्व प्राणी या तुझ्या विश्वरूपात मला दिसत आहेत. देवा, तू काेठून आलास? तू येथे बसला आहेस की, उभा आहेस? तू काेणत्या आईच्या पाेटी आलास? तुझी आकृती केवढी आहे? तुझे रूप, तुझे वय हे मी कसे जाणू?