मागील समासात बद्ध असणाऱ्या प्रपंची माणसांची लक्षणे श्रीसमर्थांनी स्पष्ट केली आहेत. देहसुख हेच सुखसर्वस्व मानून त्याच्या प्राप्तीसाठी पैसा, कामवासना यांच्यात पूर्णपणे गुरफटून गेलेला आणि त्याहून वेगळे काही शाश्वत सुख आहे याची जाणीवही नसणारा ताे बद्ध! अशा माणसाच्या आयुष्यातही अशी एखादी वेळ येते, घटना घडते की त्याचा हा भ्रम मुळापासून गदगदा हलवला जाताे आणि या सगळ्या नाशवंत गाेष्टींत तथ्य नाही या सत्याची त्याला तीव्रतेने जाणीव हाेते.असाध्य राेग, पैशाची प्रचंड हानी, प्रिय व्यक्तीचा अकस्मात मृत्यू, विश्वासघात, अपघात अशा अचानक गाेष्टींनी त्याचा भ्रम नाश पावताे आणि त्याला खऱ्या चिरंतन सत्याचा आणि कल्याणाचा मार्ग शाेधावयाची तीव्र तळमळ लागते.अशी तळमळ उत्पन्न झालेला जीव म्हणजेच माेक्षाची वाट शाेधणारा मुमुक्षू हाेय.
अशाची अवस्था, लक्षणे आणि परिश्रमांचे वर्णन श्रीसमर्थांनी या आठव्या ‘‘मुमुक्षुलक्षण’’ समासात केलेले आहे.श्रीसमर्थ म्हणतात की, बद्ध माणूस स्वैराचाराने संसार करीत राहताे; पण कधीतरी त्याच्यावर दु:खाचा प्रसंग येताे. प्रपंचातील तापत्रयाने ताे हैराण हाेऊन जाताे. मार्ग सुचत नाही अशी त्याची किंकर्तव्यमूढ अवस्था हाेऊन जाते.अशा वेळी काेणा साधुसंताचा उपदेश त्याच्या वाचण्यात, ऐकण्यात येताे आणि आजपर्यंत आपले वागणे चुकले ही प्रखर जाणीव हाेऊन खऱ्या सत्याचे भान येते.कधीतरी काेठेतरी । एखाद्याच भावक्षणी । जशी चम कावी वीज । स्वप्नातून खुले नीज ।। तसा सत्याचा प्रकाश । मना स्पर्शून जाताना । कळे ‘मी’पणाची चूक । बद्ध मुमुक्षु हाेताना ।। - (आनंदी)