समाजात असे भरपूर वक्ते, गायक किंवा व्यासपीठाचे नेतृत्व करणारे लाेक आहेत की त्यांना खराेखरच श्राेता, प्रेक्षकांना आपल्या कृतीतून समाधान मिळत आहे का ? हे कळत नाही. खरे म्हणजे श्राेत्यांना, प्रेक्षकांना समजत आहे का ? हा प्रश्न तर फारच दूर राहिला, कारण अनेकांना स्वत:लाच काय करताे आहाेत, काय सांगताे आहाेत, काय आणि कसे गात आहाेत हेच कळत नाही.ज्याला स्वत:लाच स्वत:चे कळत नाही, त्याचे इतरांना कळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा लाेकांना घमेंडही भरपूर असताे. आपणाला खूपच चांगले येते अशा भ्रमात हे लाेक राहतात.
यांचे लक्ष, यांची पूजा श्राेत्यावर, प्रेक्षकांवर जवळपास नसतेच. यांची पूजा, यांचे लक्ष केवळ धन किती व केव्हा मिळेल याकडेच असते. स्वत:चे गायन स्वत:ला न कळणाऱ्या पण मानधनासाठी, पैशासाठी ताेंड वासणाऱ्या कलाकाराबद्दल बाेलतांना तुकाराम महाराज, गाताे तेंही नाही ठावे। ताेंड वासी कांही द्यावें ।। दुसऱ्याला आनंद देण्यासाठी स्वत:कडे देण्यासारखे कांही तरी असावे लागते. स्वत:कडे कांही नसतांना किंवा स्वत:च्या जीवनात आचरण शून्य असतांना लाेकांना मार्गदर्शन करणे चुकीचे असते. जय जय राम कृष्ण हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448